‘शिफु सन-कृती’प्रकरणी न्यायालयाची टिप्पणी

कथित ‘शिफु सन-कृती’चा म्होरक्या सुनील कुलकर्णी याच्या अटकेनंतर करण्यात आलेल्या तपासातून पुढे आलेली माहिती ही धक्कादायक असल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने मंगळवारी केली. तसेच पोलिसांच्या तपासाबाबत समाधान व्यक्त केले.

न्यायालयाकडून कानउघाडणी होताच कथित ‘शिफु सन-कृती’च्या नावाखाली अंमली पदार्थ तस्करी आणि वेश्याव्यवसाय केला जात असल्याच्या आरोपाप्रकरणी पोलिसांनी लगेचच कुलकर्णीला अटक केली. शिवाय त्याच्या चौकशीत उघड झालेल्या बाबींचा आणि प्रकरणाच्या करण्यात आलेल्या तपासाचा अहवालही न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती ए. एम. बदर यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी सादर करण्यात आला. तो वाचल्यानंतर तपासात उघड झालेली माहिती धक्कादायक असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली. पोलिसांचा आतापर्यंतचा तपास समाधानकारक असून ज्या काही धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत त्याचा तपास करण्याची गरज असल्याचेही न्यायालयाने म्हटले.

दरम्यान, ज्या दोन मुलींच्या पालकांनी ही याचिका केली आहे, त्या मुलीही सुनावणीच्या वेळी वकिलासोबत न्यायालयात हजर होत्या. एवढेच नव्हे, तर त्यांनी हस्तक्षेप याचिका करण्यात येणार असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यावर आधी त्याबाबतची याचिका करा, नंतर ती ऐकायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल, असे न्यायालयाने त्यांना सांगितले.

  • एका नामवंत सनदी लेखाकारांच्या दोन्ही कन्या सध्या आईवडिलांविरुद्धच तक्रार करीत आहेत. या दोघी घरातून निघून गेल्या आहेत. स्वखुशीने घरातून निघून गेल्याचे त्या सांगत असल्या तरी कुठल्या तरी दडपणाखाली वावरत असाव्यात, असे वाटून आईवडिलांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. गुन्हे अन्वेषण विभागामार्फत सध्या तपास सुरू असला तरी तो गंभीरपणे केला जात नसल्याचा आरोप करत या मुलींच्या आईवडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याची दखल घेत हा प्रकार म्हणजे समाजविरोधी गुन्हाच आहे, असे नमूद करत त्याकडे कानाडोळा करणाऱ्या पोलिसांना न्यायालयाने फैलावर घेतले होते.
  • तसेच या कथित ‘शिफु संस्कृती’चा संस्थापक सुनील कुलकर्णी आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते.