दिल्ली, पुणे, नागपुरात फसवणूक; चेक न वठल्याचे गुन्हे

शिफू संन-कृतीचा म्होरक्या व बोगस डॉक्टर सुनील कुलकर्णी याने प्रभावाखाली घेतलेल्या दोन तरुणींची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या तपासातून उघड झाली आहे. तपासादरम्यान यापैकी एका तरुणीने सही केलेला व त्यावर कुलकर्णीने तब्बल १५ लाखांची रक्कम भरलेला धनादेश पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते. तसेच कर्ज मिळवण्यासाठी या तरुणींना जामीनदार ठेवण्याचा प्रयत्नही केल्याची माहिती पुढे येते आहे. दरम्यान, शुक्रवारी दंडाधिकारी न्यायालयाने कुलकर्णीच्या पोलीस कोठडीत ३ मेपर्यंत वाढ केली.

‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार कुलकर्णीने आपल्या प्रभावाखाली असलेल्या सर्वानाच अंधारात ठेवले होते. कुलकर्णी डॉक्टर नाही, तो मानसोपचारतज्ज्ञ नाही, त्याच्या सर्व पदव्या खोटय़ा, बोगस आहेत, त्याला गुन्हेगारी पाश्र्वभूमी आहे याची पुसटशीही कल्पना शिफूच्या प्रभावाखाली असलेल्यांपैकी एकालाही नव्हती. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका करणाऱ्या निवृत्त अधिकाऱ्याच्या दोन्ही मुलींचे जबाब गुन्हे शाखेने नोंदवले. शिवाय त्यांना कुलकर्णीबाबत तपासातून पुढे आलेली माहितीही दिली. तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कुलकर्णीच्या सांगण्यावरून एका कोऱ्या धनादेशावर यापैकी एका तरुणीने सही केली होती. मात्र नंतर कुलकर्णीने त्यावर १५ लाखांची रक्कम लिहिली याबाबत ती अनभिज्ञ होती.

याबाबत गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कुलकर्णीने काही तरुणांची महत्त्वाची कागदपत्रे स्वत:कडे घेतली होती. त्यात बँकेचे चेकबुक, डेबिट-क्रेडिट कार्ड आदींचा समावेश होता. मात्र त्याआधारे कोणताही आर्थिक व्यवहार झाल्याचे अद्यापर्यंतच्या तपासात पुढे आलेले नाही. त्याबाबत तपास सुरू आहे.

मात्र कुलकर्णीविरोधात दिल्ली, नागपूर येथे धनादेश न वठल्याबद्दल गुन्हे दाखल आहेत. एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो, कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवून त्याने दिल्ली, नागपूर आणि पुण्यात काहींना गंडा घातला होता. त्या प्रकरणांमध्येही गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आली आहे. त्यामुळे या तरुणीच्या धनादेशाचा वापर कुलकर्णी फसवणुकीसाठी करणार होता, असा संशय गुन्हे शाखेला आहे.

या दोन्ही तरुणींची ओळख कुलकर्णीसोबत करून देणाऱ्या तरुणाचा जबाब गुन्हे शाखेने नोंदवला आहे. कुलकर्णीच्या प्रभावाखाली आलेला हा पहिला तरुण असावा. त्याच्या नावाचा वापर करून कुलकर्णीने छापलेली व्हिजिटिंग कार्ड गुन्हे शाखेला सापडली आहेत. त्यावर या तरुणाला ‘दि फिनिशिंग’ अकादमीचा पदाधिकारी असल्याचे भासवण्यात आले आहे. ही बाब माहीत नव्हती, असा दावा या तरुणाने जबाबात केला. दरम्यान, तरुणींच्या पालकांनी उच्च न्यायालयात केलेल्या दाव्यानुसार हा तरुण कुलकर्णीचा अत्यंत विश्वासू साथीदार आहे व त्यानेच तरुण-तरुणींना थापा मारून कुलकर्णीच्या जवळ आणले होते.

कुलकर्णीच्या वांद्रे येथील भाडय़ाच्या खोलीत सुमारे तीसेक तरुणींचे फोटो सापडले. मॉडेलिंग क्षेत्रात संधी देण्याच्या आमिषावर कुलकर्णीने हे फोटो काढून घेतले असावेत, असा संशय आहे. या तरुणी कोण आहेत याचा तसेच कुलकर्णीच्या मोबाइल व पेन ड्राइव्हमध्ये नग्नावस्थेत आढळलेले फोटो, अश्लील चित्रण कोणाचे याचा शोध पोलीस घेत आहेत.