मराठी कलाकारावर अन्याय होऊ देणार नसल्याचा इशारा, वादाला नवे वळण
‘भाभीजी घर पे है’ या मालिकेतून बाहेर पडलेल्या अभिनेत्री शिल्पा शिंदेने या प्रकरणी मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेकडे धाव घेतली आहे. शिल्पा शिंदे आणि निर्माती बेनिफर कोहली, ‘सिन्टा’ यांच्यातील वादाला आता ‘मनसे’ प्रवेशामुळे राजकीय स्वरूप प्राप्त झाले असून शिल्पासारख्या मराठी अभिनेत्रीला राज्यात कुठेही काम करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तसा प्रयत्न कोणी केल्यास त्याला ‘मनसे’ शैलीत उत्तर मिळेल, असा इशारा दिला असल्याने एकूणच या प्रकरणाला मराठी-अमराठी वादाचा रंग चढला आहे.
शिल्पा शिंदे या अभिनेत्रीला ‘भाभीजी घर पे है’ या मालिकेतून काढून टाकण्याचा तसेच तिच्यावर अन्य मालिकांमधून काम करण्यास बंदी घालण्याचा ‘सिन्टा’ या संघटनेने घेतला निर्णय चुकीचा आहे. कलाकाराच्या काम करण्याच्या हक्काची कोणीही अशी पायमल्ली करू शकत नाही, अशी भूमिका ‘महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेने’च्या प्रमुख शालिनी ठाकरे आणि अध्यक्ष अमेय खोपकर यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली. याआधी प्रत्युषासारख्या अभिनेत्रीनेही मालिका सुरू असतानाच काम सोडले होते, मात्र त्या वेळी अशा कुठल्याच संघटना त्यांच्याविरोधात एकत्र आल्या नव्हत्या. शिल्पा मराठी असल्याने तिला एवढा विरोध होत असून तिच्यावरचा हा अन्याय सहन के ला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माध्यमांसमोर येणे टाळणारी शिल्पा या वेळी उपस्थित होती. निर्माते आपला छळ करत आहेत, याचा पुनरुच्चार करतानाच निर्मात्यांनी आपल्याशी करार केला म्हणजे त्यांनी आपल्याला विकत घेतले आहे का, असा उलट प्रश्न शिल्पाने केला. निर्मात्यांबरोबर आपली कायदेशीर लढाई सुरू असल्याने ‘सिन्टा’ किंवा अन्य कोणतीही संघटना या प्रकरणी ढवळाढवळ करू शकत नाही, असेही तिने स्पष्ट केले.

नियमांना बांधील राहून कारवाई केली – सुशांत सिंग, सचिव (सिन्टा)
राजकीय पक्षाच्या मदतीने शिल्पाने जे आरोप आमच्यावर केले आहेत त्यात काहीच तथ्य नसल्याचे ‘सिन्टा’चे सचिव सुशांत सिंग यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. ‘सिन्टा’ने शिल्पाला काम करण्यावर कोणतेही बंधन घातलेले नाही. शिल्पाबाबत तक्रार आल्यानंतर निर्मात्यांशी तिने केलेल्या करारासह अन्य कागदपत्रे आम्ही तपासून पाहिली. त्यावर ‘सिन्टा’सह फेडरेशनने शिल्पाला मालिका सोडायची असल्यास निर्मात्यांचे झालेले आर्थिक नुकसान भरून द्यावे, असा पर्याय सुचवला होता. तसे करायचे नसल्यास तिने पुन्हा चित्रीकरण सुरू करावे, असेही सांगण्यात आले होते. मात्र यापैकी कोणतीही गोष्ट तिने केली नसल्याने अशा प्रकारे अव्यावसायिक वृत्तीने वागणाऱ्या कलाकाराकडून काम करून घेऊ नये, अशी लेखी विनंती इतर सदस्यांना फेडरेशनने केली असल्याची माहिती सुशांत सिंग यांनी दिली. शिल्पाला हा निर्णय पटला नसेल तर तिने याविरोधात कायदेशीर आव्हान द्यावे. मात्र तिने तसे केलेली नाही. ‘सिन्टा’ला कोणतीही कायदेशीर नोटीस मिळाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी मराठी-अमराठी वाद सुरू आहे, मात्र शिल्पाच्या जागी शुभांगी अत्रे ही मराठी अभिनेत्रीच काम करते आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.