शिवाजीपार्कवर बाळासाहेबांच्या अंत्यविधीसाठी बांधण्यात आलेला चौथरा सोमवारी मध्यरात्री शिवसेनेने हलविला. यावेळी महापौर सुनील प्रभू, सुभाष देसाई आणि शिवसेनेचे अन्य वरिष्ठ नेते उपस्थीत होते. चौथरा हलवतांना चौथ-याच्या सर्व बाजूंनी पडदे लावण्यात आले होते. चौथरा हलवण्याचे काम शांततेत पार पडले असून मैदानावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील जागेचा स्मारकासाठी विचार केला जात आहे. यासाठी शिवसेनेकडून आज (मंगळवार) महानगरपालिकेत प्रस्ताव दाखल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिवाजी पार्कमधील चौथरा सोमवारी हटविण्याचे आश्‍वासन शिवसेनेकडून देण्यात आले होते. त्यानुसार मध्यरात्री हा चौथरा हलविण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना या प्रक्रियेचे चित्रिकरण करण्यास बंदी घालण्यात आली होती.
बाळासाहेबांच्या अंत्यविधीनंतर सदर जागेवरील चौथरा न हलवण्याची भूमिका शिवसेना नेत्यांनी  घेतली होती
यामुळे तणाव निर्माण झाला होता. अखेर सोमवारी मध्यरात्री मुंबईचे महापौर सुनील प्रभू,  सेनेचे नेते राहुल शेवाळ, अनिल देसाई, मोहन रावले आणि सदा सरवणकर याच्या देखरेखेखाली  चौथरा हलवण्याचे काम सुरू झाले. शिवाजी पार्कवरील पोलीस बंदोबस्त तसाच ठेवण्यात आला आहे.