दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसह विविध प्रश्नांवर विरोधक आक्रमक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेकडूनही या प्रश्नांवर कोंडीत पकडले जाणार आहे. संपूर्ण कर्जमाफीच्या विरोधकांच्या मागणीला शिवसेनाही अनुकूल असून, शेतकऱ्यांपर्यंत पुरेशी मदत पोचली नसल्याने सत्ताधारी शिवसेनाही सरकारवर हल्लाबोल करणार आहे.
भाजप नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाल्यावरही शिवसेनेने विरोधी पक्षाची भूमिका सोडलेली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवरही अनेकदा टीकास्त्र सोडले आहे. ‘सामना’ मुखपत्रातूनही सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. या पाश्र्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना सभागृहात आक्रमक भूमिका घेणार असल्याने सरकारची अडचण होणार आहे. भाजप-शिवसेनेतील जुगलबंदी नेहमीचीच झाली असली तरी भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे, असा केंद्र व राज्य सरकारबद्दल विरोधकांकडून प्रचार सुरू आहे. त्यास शिवसेनेचीही साथ मिळाल्यावर भाजपची कोंडी होणार आहे.  सत्तेत सहभागी असली तरी शिवसेनेकडून या मुद्दय़ांवर सरकारला पाठिंबा दिला जणार नसून शेतकऱ्यांना अधिक मदत देण्याची त्यांची भूमिका आहे. शिवसेनाही विरोधकांची भूमिका पार पाडण्याची चिन्हे असल्याने भाजपला विधिमंडळात एकाकी लढत द्यावी लागणार आहे.