दरवर्षी मुंबईत लाखभर झाडांचे रोपण करण्याचा संकल्प सोडणाऱ्या आणि आता आरे वसाहतीमध्ये वृक्ष संवर्धनासाठी धाव घेणाऱ्या पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने गेल्या तीन वर्षांमध्ये विकासकामांच्या आड आलेल्या तब्बल ३,८५९ झाडांची कत्तल करण्यास मंजुरी दिल्याचे उघडकीस आले असून शिवसेनेच्या वृक्ष संवर्धनाच्या बेगडी प्रेमाबद्दल मुंबईकरांमध्ये तीव्र नाराजी पसरू लागली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
मुंबईमधील विकासकामांच्या आड येणारे तब्बल ३३,२०९ वृक्ष तोडण्यास परवानगी मिळावी यासाठी १ एप्रिल २०१२ ते २८ फेब्रुवारी २०१५ या काळामध्ये पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीसमोर प्रस्ताव सादर करण्यात आले होते. mp73त्यापैकी १,२६८ वृक्ष मृत असल्याचे दर्शविण्यात आले होते, तर ३,८५९ वृक्ष तोडण्यास आणि २०४ वृक्षांच्या फांद्या तोडण्यास वृक्ष प्राधिकरण समितीने परवानगी दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. विशेष म्हणजे वृक्षतोडीसाठी वृक्ष प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या परवानगीची लेखी माहिती कुठेच उपलब्ध नाही, असा गौप्यस्फोट धनंजय पिसाळ यांनी केला.
एकूण ३३,२०९ पैकी १६,४०७ वृक्ष ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश वृक्ष प्राधिकरण समितीने दिले, तर ११,४४१ वृक्षांचे अन्यत्र पुनरेपण करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या वृक्षांचे पुनरेपण कुठे करण्यात आले त्याची माहिती उपलब्ध नाही. त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा, अशी मागणी पिसाळ यांनी केली आहे.
‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले १६,४०७ वृक्ष नेमके कुठे आहेत, याची माहिती सादर करावी, असेही पिसाळ यांनी सांगितले.