आयपीएलचे माजी सर्वेसर्वा ललित मोदी यांना मदत केल्याप्रकरणी सुरू असलेल्या वादात आता शिवसेनेने उडी घेतली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी लंडन येथे मोदींची भेट घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. त्यावरून शिवसेनेने मारिया यांची पाठराखण करत मोदी प्रकरणाचा नायटा जितका खाजवाल तितका तो वाढतच जाईल. त्यामुळे मारियांसारख्यांचा नाहक बळी जाईल, त्यामुळे हा प्रकार लवकरात लवकर थांबवावा, असा सल्ला शिवसेनेने भाजपला दिला आहे. राकेश मारिया यांनी मुंबईच्या सुरक्षेबाबत केलेले अजोड कामगिरी लक्षात घेता त्यांच्या मोदी भेटीचा बागुलबुवा उभा करणे म्हणजे राईचा पर्वत करण्यासारखे आहे. याप्रकरणात भाजप सुषमा स्वराज व वसुंधरा राजे यांच्या मागे ठामपणे उभा आहे. मग, राकेश मारियांना वेगळा न्याय का, हा सवालही अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.
पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रातील अग्रलेखातून मोदी प्रकरणावर शिवसेनेने आपली भूमिका मांडली आहे. ललित मोदी हे गेल्या पाच-दहा वर्षांत कुणाकुणाला भेटले व त्यांचे कुणाबरोबर फोटो आहेत यावरून सध्या देशाचे राजकारण तापले आहे. केंद्रातले मंत्री, राजस्थानच्या मुख्यमंत्री यांच्यावर मोदीप्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच मुंबईचे जोरकस पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनाही ललित मोदीप्रकरणी आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा बकवास प्रयत्न सुरू असल्याचे या लेखात म्हटले आहे. राकेश मारिया लंडन येथे एका कॉन्फरन्ससाठी गेले असताना ललित मोदी त्यांना स्वत:ची कैफियत सांगण्यासाठी भेटले. इंग्लंड हा स्वतंत्र देश आहे व त्या देशाच्या परवानगीने ललित मोदी तेथे वास्तव्यास आहेत. मोदी यांनी हिंदुस्थानात ‘आयपीएल’मध्ये जे दिवे लावले तो वादाचा विषय असला तरी लंडन येथे मोदी यांना बेड्या ठोकून मुंबई किंवा दिल्लीत फरफटत आणण्याचा अधिकार मुंबईच्या आयुक्तांना नाही.
ललित मोदी हे देशात ‘आयपीएल’ क्रिकेटचे बादशहा असताना देशातील सर्वच राजकीय नेत्यांबरोबर त्यांचे ‘हसरे’ फोटो प्रसिद्ध झाले आहेत. या सगळ्यांवर आता कारवाई करणार काय? असा सवालही शिवसेनेने या अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपला विचारला आहे.