महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत गुरुवारी मातोश्रीवरून देण्यात आल्याची वेळ साधत शिवसेनेच्या नेत्यांनी पालिका मुख्यालयात आयुक्तांची भेट घेतली. भाजपाकडून सातत्याने होत असलेल्या माफियाराजच्या आरोपामागचे सत्य पुढे आणण्याचे आव्हान देत महापौरांनी आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपावर निशाणा साधला. त्याचवेळी झोपडय़ांवरील कारवाई थांबवली नाही तर सेना रस्त्यावर उतरण्याचा इशाराही सेनेने दिला आहे.

गुरुवारी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, आमदारसुनिल प्रभू, महापौर स्नेहल आंबेकर, सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव व स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. भाजपाचे खासदार किरीट सोमय्या तसेच इतरांकडून पालिकेत माफियाराज, दलालराज असल्याचे आरोप सुरू आहेत.

दसऱ्याला मुलुंडमध्ये पालिकेतील माफियाराजच्या दहनावरून शिवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीही झाली होती. याच पाश्र्वभूमीवरआंबेकर यांनी आयुक्तांना  चार ओळीचे पत्र दिले आहे.

‘महाराष्ट्रात सध्या गुंड व राजकारणावर चर्चा सुरू असून मुख्यमंत्र्यांच्या गुंडासोबतच्या छायाचित्राने खळबळ उडाली आहे. तसेच आपण प्रशासकीय प्रमुख म्हणून आल्यावर पालिकेच्या इतिहासात प्रशमच माफिया राज, दलाल राज असल्याचे गंभीर आरोप होत आहेत, तरी याबाबतचे सत्य मुंबईकरांसमोर ठेवावे,’ अशा आशयाच्या महापौरांनी आयुक्तांना दिलेल्या पत्राने खळबळ उडाली.