शिवसेना-भाजप युतीची भविष्यातील वाटचाल दोन्ही पक्षांवर अवलंबून असेल, असे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांत भाजप आणि शिवसेनेमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव यांचे हे वक्तव्य सेनेची आक्रमक भूमिका स्पष्ट करणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी गुरूवारी मातोश्रीवर आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये १५-२० मिनिटे चर्चा झाली. यानंतर झालेल्या पत्रकारपरिषेदत सुधीर मुनगंटीवार यांनी युतीत सर्व काही आलबेल असल्याचे सांगत शिवसेना-भाजपमधील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मी उद्धव यांना केवळ वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आलो होतो. आजच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. युतीमधील तणाव ही अंतर्गत बाब आहे. कुरबुरी होत असल्या तरी आमचे एकमेकांवरील प्रेम कायम आहे. आम्ही गेल्या २५ वर्षांपासून एकत्र आहोत. युतीमध्ये असलेल्या ताणतणवांची चर्चा सार्वजनिकरित्या होणार नाही, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
मात्र, दुसरीकडे उद्धव यांनी आक्रमक भूमिका घेत युतीची भविष्यातील वाटचाल दोन्ही पक्षांवर अवलंबून असेल, असे ठामपणे सांगितले. युतीतला वाद मिटेल की नाही हे मला माहित नाही. मात्र, आम्हाला ज्या धोरणात्मक गोष्टी पटणार नाही, त्यावर आम्ही बोलूच असे उद्धव यांनी म्हटले. दरम्यान, आजची भेट राजकीय नव्हती. आम्ही केवळ गमतीजमती आणि जुन्या आठवणींबद्दल बोललो, असे सांगत उद्धव यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. राज्यातील वाघांच्या संख्येबाबत आमची चर्चा झाली. वाघांची संख्या ही वाढली पाहिजे. राज्यातलेच नाही तर देशातले वाघ वाढले पाहिजेत यावर आमचे एकमत झाले, असे सांगत उद्धव यांनी मुनगंटीवारांना टोला हाणला.