मुंबई महापालिकेच्या बाजार व उद्यान, विधी आणि महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा युतीचा भगवा झळकला. बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे अजित भंडारी, विधी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे कृष्णा पारकर, तर महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या संजना मुणगेकर विजयी झाल्या.
बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे अजित भंडारी १९ मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवार सुषमा मकलेश राय यांना १० मते मिळाली. तर उपाध्यक्षपदी युतीचे मुकेश मिस्त्री १९ मते मिळवून विजयी झाले. या निवडणुकीत २९ सदस्यांनी भाग घेतला. तर पाच सदस्य अनुपस्थित होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन, तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत एक सदस्य तठस्थ राहीला. विधी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक कृष्णा (महेश) पारकर विजयी झाले. त्यांना १९ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार मनोज जामसुतकर यांना १० मते मिळाली. उपाध्यक्षपदी युतीचे इलियास बशीर शेकर विजयी झाले. या निवडणुकीत २९ जण सहभागी झाले होते, तर सहा जण अनुपस्थित होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एक जण तठस्थ, तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत एक जण अनुपस्थित होता. महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजना मुणगेकर १९ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवार बिनिता वोरा यांना ९ मते मिळाली. उपाध्यक्षपताच्या निवडणुकीत महायुतीच्या बिना दोशी विजयी झाल्या. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ३५ सदस्यांपैकी २८, तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत २९ सदस्यांनी सहभाग घेतला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सात, तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहा सदस्य अनुपस्थित होते.