आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ४ सप्टेंबरला मुंबईत येत असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मात्र त्यांची भेट निश्चित करण्यात आलेली नाही. महायुती भक्कम असल्याचा निर्वाळा भाजप-शिवसेनेचे नेते देत असले तरी त्यांच्यातील तणाव वाढत असून शिवसेनेने सर्व २८८ मतदारसंघांतील उमेदवार निश्चित केले आहेत. भाजपच्या कथित सर्वेक्षणात शिवसेनेला केवळ ५० जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने सेनेशी युती तोडावी, अशी आग्रही मागणी भाजपच्या नेत्यांकडून शहा यांच्याकडे केली जाणार असल्याचे समजते. भाजप शिवसेनेशी युती तोडणार का, याचा निर्णय किंवा दिशा यावेळी ठरण्याची चिन्हे आहेत.
अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अमित शहा प्रथमच मुंबईत येत असून निवडणुकीची व्यूहरचना निश्चित करण्यात येणार आहे. महायुतीच्या जागावाटपाचे गाडे अडले असून, किमान १४४ जागांसाठी भाजप तर पूर्वीचेच सूत्र कायम ठेवण्याबाबत सेना आग्रही आहे. त्यामुळे शहाच याबाबत तोडगा काढतील. जागा वाढवून देण्याची तयारी नसल्यास युती तोडण्यासाठी भाजप नेते आग्रही आहेत. शहा यांनाही शिवसेनेबद्दल फारसा जिव्हाळा नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन यांनी चांगले संबंध ठेवले व राजनाथसिंह यांचेही उद्धव ठाकरे यांच्याशी सलोख्याचे संबंध होते. त्या तुलनेत शहा हे शिवसेनेबरोबर फटकून वागत आहेत. अडवाणी, राजनाथसिंह यांच्याप्रमाणे मुंबईत आल्यावर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची उत्सुकता शहा यांनी दाखवलेली नाही. मी पक्षप्रमुख असल्याने केवळ भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशीच बोलेन, अशी भूमिका ठाकरे यांनी घेतली होती. पण युतीतील संवाद जपण्यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांच्याशीही चर्चा केली. तरीही शहा हे मुंबईत येत असताना त्यांनी ठाकरे यांच्याशी भेट ठरविलेली नाही.
भाजपचा कथित अहवाल
भाजपने तीन वेगवेगळ्या संस्थांमार्फत सर्वेक्षणे केली असून त्याचे अहवाल आले आहेत. त्यात शिवसेनेला केवळ ५० जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे युती कायम न राहिल्यास निवडणुकीनंतर भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस वा अन्य पक्ष, असे काही वेगळे समीकरण जुळेल, अशीही चर्चा आहे. भाजप नेत्यांनी मात्र असा अहवाल आल्याचा इन्कार केला आहे.
शिवसेनेचीही तयारी
मात्र भाजप कधीही दगा देण्याची शक्यता गृहीत धरून शिवसेनेनेही सर्व २८८ जागांवर तयारी सुरू ठेवली आहे. ठाकरे यांनीही राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ५ सप्टेंबरला आयोजित केली आहे.
अमित शहा यांचा कार्यक्रम
*मुंबईत आगमन झाल्यावर अमित शहा हे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या विलेपार्ले येथील निवासस्थानी जातील.
*प्रदेश सुकाणू समितीच्या नेत्यांशी त्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव खासदार पूनम महाजन यांच्या वरळी येथील निवासस्थानी शहा हे दुपारचे भोजन घेतील.
*भाजप पदाधिकाऱ्यांच्या षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या मेळाव्यास शहा मार्गदर्शन करणार आहेत. शहा हे ‘लालबागचा राजा’ गणपतीचे दर्शनही घेणार आहेत. ते भाजप मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्या निवासस्थानीही जातील.