औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकीप्रमाणेच वसई-विरार महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना आणि भाजपने एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जागावाटपावरून उभयतांनी एक पाऊल मागे घेत हितेंद्र ठाकूर यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.
mu03वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांपैकी शिवसेना ७५, तर भाजप ४० जागा लढविणार असल्याचे शिवसेना उपनेते अनंत तरे आणि भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी जाहीर केले. भाजपने ५२ जागांचा आग्रह धरला होता. शिवसेनेने एवढय़ा जागा देण्यास नकार दिला होता. पण कोणत्याही परिस्थितीत युती झाली पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना केल्या होत्या. गेले दोन दिवस चार-पाच जागांवरून ताणाताणी सुरू होती. शेवटी पर्यावरणमंत्री रामदास कदम, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, अनंत तरे, कपिल पाटील या नेत्यांमध्ये दिवसभर झालेल्या चर्चेतून युती आकारास आली.
सत्तेत आल्यापासून महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शक्यतो युती करावी, असा मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रयत्न राहिला आहे. सध्या भाजपची हवा असल्याने शिवसेनेनेही भाजपबरोबर जमवून घेण्यावर भर दिला आहे. यातून नवी मुंबई आणि औरंगाबादमध्ये उभयतांनी एक पाऊल मागे घेतले होते. हाच प्रयोग वसई-विरारमध्ये झाला आहे. माजी आमदार विवेक पंडित यांनी श्रमजीवी संघटनेच्या नावावर निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. पण पंडित हे शिवसेना उपनेते असल्याने त्यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी शिवसेनेची भूमिका आहे.