पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद महंमद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनावरून सोमवारी शिवसेना-भाजपमधील संघर्षांला फुटलेले तोंड बुजविण्यासाठी आता नव्या वातावरण निर्मितीचे प्रयत्न उभय बाजूंनी सुरू झाले असले, तरी पक्ष-संघटनेच्या पातळीवर मात्र एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हाने सुरूच आहेत. त्यामुळे, एकीकडे सामंजस्याचे प्रयत्न करतानाच वाद धुमसत ठेवण्याच्या नव्याच राजनीतीची झलक मंगळवारी दिवसभर राज्यातील जनतेस पाहावयास मिळाली. ‘हिंमत असेल तर सरकारमधून बाहेर पडा,’ असे आव्हान भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी पडद्याआडून देत आहेत, तर ‘आम्ही बाहेर पडणार नाही, ज्यांना आमची अडचण वाटते त्यांनीच बाहेर पडावे,’ असे अजब आव्हान देऊन सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

केवळ अहंकारापोटीच उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाकडे पाठ फिरविली अशी टीकाही भाजपच्या वर्तुळातून होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादाबाबत संजय राऊत यांनी काढलेला शंकेचा सूरही भाजपला दुखावणारा ठरला आहे. शिवसेनेने आम्हाला राष्ट्रवादाचे धडे देऊ नयेत असे सांगत, पाकिस्तानी खेळाडू-गायकांच्या मैफिलीत रमणाऱ्या सेनेतील दिग्गजांच्या इतिहासाचीही भाजपमध्ये उजळणी सुरू आहे. कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने शिवसेनेने केलेल्या विरोधाचा अन्य राष्ट्रांसोबतच्या संबंधांवर काहीही परिणाम होणार नाही, कारण आमचा विरोध केवळ पाकिस्तानला आहे, असे सांगत सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सोमवारची कटुता मवाळ करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी परवानगी देऊन मुख्यमत्र्यांनीही उभय पक्षांतील तणाव निवळण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे.