शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सारवासारव

खड्डे पडले, पाणी तुंबले, वाहतूककोंडी.. पहिल्यांदाच दणकून लागलेल्या पावसात या साऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागले असले तरी ‘पाऊसच जोरदार पडतो, त्याला पालिका काय करणार’, असे स्पष्टीकरण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. मंगळवारी, मुलुंड येथील महाकवी कालिदास नाटय़गृहाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना ठाकरे यांनी यंत्रणेच्या ढिलाईमुळे होणाऱ्या गोंधळाचा सर्व दोष पावसावर ढकलला. त्याचवेळी या पावसात मुंबईत अजिबात पाणी तुंबणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

‘नालेसफाई कधीच पूर्ण होत नाही’ असे शाश्वत सत्य नालेसफाई पाहणीवेळी उद्धव ठाकरे यांनी मे महिन्यात सांगितले होते.  त्याच्या पुढे एक पाऊल जात त्यांनी मुंबईकरांच्या हालअपेष्टांना आकाशीचा देव कारणीभूत असल्याचे नवीन सत्य उघड केले. ‘आरोप करणे, गोंधळ घालणे खूप सोपे आहे. मात्र मुंबईत पाऊसच एवढा पडतो की त्याला पालिका काय करणार’, असा प्रतिसवालच ठाकरे यांनी केला. ‘२६ जुलैच्या महापूराने आमचे डोळे उघडले. अतिवृष्टीमुळे आलेला पूर लक्षात घेऊन पालिकेने उपाययोजना केल्या. त्यामुळे यावर्षीही पावसाळ्यात शहरात पाणी तुंबणार नाही,’ असा दावाही त्यांनी केला. दुसरीकडे,   पालिका आयुक्त अजोय मेहता यांनीही  पालिकेने केलेल्या चांगल्या कामांमुळे यावेळी मुंबई तुंबलेली नाही, असा दावा करत स्वत:सह प्रशासनाची पाठ थोपटून घेतली.

कालिदास नाटय़गृहाशेजारी आर्ट गॅलरी तयार करावी, अशी सूचना ठाकरे यांनी केली. तसेच काळाचौकी येथील गिरणीच्या जागेत गिरणी कामगारांचे वास्तव मांडणारे टेक्सटाइल म्युझियम उभारण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. या देशावर, मुंबईवर आलेल्या संकटसमयी गिरणी कामगार रस्त्यावर उतरले होते. गिरण्यांच्या जागेवर मालकांनी मॉल उभारले. तेव्हा या म्युझियममध्ये देशासाठी घाम गाळणाऱ्या गिरणी कामगारांचे वास्तव उभे राहायला हवे, असे ते म्हणाले.

भाजपचा बहिष्कार

मुलुंडच्या कालिदास नाटय़गृहावरून गेले दीड वर्ष सेना-भाजपमध्ये सुरू असलेल्या मानापमान नाटकामुळे भाजपाने लोकार्पण कार्यक्रमावर बहिष्कार घातला. या नाटय़गृहाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते  व्हावे, अशी भाजप नगरसेवकांची इच्छा होती. मात्र सेनेने त्याला फारसे महत्त्व दिले नसल्याने भाजपचा कोणताही मंत्री, आमदार व नगरसेवक या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.