‘करून दाखविल्या’ची जोरदार जाहिरातबाजी करत एकटय़ाने मुंबईचा विकास केल्याच्या बाता मारणारी शिवसेना ‘मैदान-उद्यानांच्या दत्तक विधान’प्रकरणी आयुक्तांनी प्रस्ताव आणला असा दावा कसा करू शकते, असा सवाल आता भाजपने उपस्थित केला आहे. जमीन अधिग्रहणाच्या प्रस्तावाला केंद्रात कॅबिनेटच्या बैठकीत पाठिंबा दिला आणि बाहेर विरोध केला तेव्हा आपण कोणती अवलाद होतो, याचा विचार शिवसेना नेतृत्वाने प्रथम करावा नंतरच भाजपची अवलाद काढावी, असा जोरदार टोला लगावत ठाकरे यांच्या दुटप्पी भूमिकेवर भाजपच्या नेत्यांनी हल्ला चढविला.
मुंबई महापालिकेत उद्याने व मैदानाच्या दत्तकविधानाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्यावर जोरदार टीका सुरू झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला स्थगिती देऊन आढावा घेण्याचे आदेश दिले. यामुळे अस्वस्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढले. त्याला प्रत्युत्तर देताना जमीन अधिग्रहणाच्या प्रस्तावाला शिवसेनेने कॅबिनेटमध्ये पाठिंबा देऊन नंतर विरोध केल्याची आठवण मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी करून दिली. सत्तेत सोबत राहायचे आणि वेगवेगळ्या मुद्दय़ांवर रोज विरोध करत बसायचे, हे शिवसेनेचे धोरण कशात बसते, असा सवालही शेलार यांनी केला आहे.
मैदानांचा प्रस्ताव अडचणीचा ठरताच आयुक्तांनी प्रस्ताव आणला आणि भाजपनेही पाठिंबा दिला होता, अशी वक्तव्ये सेना नेत्यांकडून करण्यात येत आहेत. महापालिकेत गेली अनेक वर्षे शिवसेना-भाजप सत्तेत आहे. मात्र ‘करून दाखविल्या’ची जाहिरातबाजी करताना सारे श्रेय लाटण्याचे काम शिवसेना एकटीच करत असते. त्यावेळी महापालिका आयुक्त अथवा भाजप का आठवत नाही, असा जळजळीत सवालही आशिष शेलार यांनी उद्धव यांचे नाव न घेता केला.
सत्तेत शेजारी बसायचे आणि ‘वायुप्रदूषण’ करायचे हे सेनेला चांगले जमते असेही त्यांनी सांगितले. मुंबईतील मोकळी मैदाने व उद्यानांच्या विषयात लोकांचे काही आक्षेप असल्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. यामध्ये एवढा आकांडतांडव करण्याचे कारण नसल्याचेही आशिष शेलार यांनी सांगितले.

या प्रस्तावाला पालिकेत भाजपनेही पाठिंबा दिला होता. परंतु, आधी पाठिंबा द्यायचा आणि नंतर विरोध करायचा असली शिवसेनेची अवलाद नाही.
– -उद्धव ठाकरे, अध्यक्ष, शिवसेना.

सध्या शिवसेनेच्या नेत्यांना अनेक गोष्टींचा क्लेश होताना दिसतो. परंतु त्यांना स्वत:ची ‘कथनी आणि करणी’ यातील अंतर का दिसत नाही. प्रत्यक्षात वेगळी भाषा करणारी शिवसेना लेखणीतून वेगळाच ‘सामना’ खेळत असते. दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ शोधणाऱ्या शिवसेनेने आपल्या डोळ्यातील मुसळ शोधल्यास त्यांचे क्लेश निश्चित कमी होतील.
आशिष शेलार,
अध्यक्ष, मुंबई भाजप.