केवळ आरोप करायचे आणि राजीनामे घ्यायचे, हा पायंडा राज्यासाठी हिताचा नाही, असे सांगत शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची पाठराखण केली. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या विरोधकांनी ज्या पद्धतीने आरोप केले आणि चिखल उडवला, ही गोष्ट लांच्छनास्पद आहे. आरोप करणारे हे स्वत: भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये गुंतले आहेत. हे घोटाळेबाज लोक तोंड वर करुन आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, ही गोष्ट लाजिरवाणी असल्याचे उद्धव यांनी म्हटले.

गेल्या काही दिवसांत होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर काल सुभाष देसाई माझ्याकडे आले. त्यांनी संपूर्ण प्रकरण मला सांगितले. मुख्यमंत्र्यांनी निष्पक्षपातीपणे चौकशी करण्याचे वचन विधानसभेत दिल्याचे देसाईंनी सांगितले. एक शिवसैनिक म्हणून मी पदाला चिकटून राहणार नाही, मी राजीनामा देऊन मोकळा होतो. मंत्री म्हणून दबाव येऊ नये. कोणाला वाटत असेल तर मी राजीनामा देतो. त्याम मी त्यांना मुख्यमंत्र्यांकडे जाऊन राजीनामा द्यायला सांगितले. त्यानुसार आज देसाई मुख्यमंत्र्यांना भेटले होते, अशी माहिती उद्धव यांनी दिली.

या प्रकरणी माझे मुख्यमंत्र्यांशीही बोलणे झाले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी असे म्हटले की, ‘चोर तो चोर वर शिरजोर’ अशी विरोधकांची प्रवृत्ती आहे. या सगळ्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यामुळे आता स्वत:च्या बचावासाठी सर्व विरोधक आक्रमकतेचा आव आणत आहेत. या दबावाला बळी पडता कामा नये. त्यामुळे विरोधकांनी आरोप केले असतील तर आपण त्याची आरोपांची चौकशी करू. जे काही सत्य असेल ते जनतेसमोर येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याची माहिती उद्धव यांनी दिली.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर देसाई यांनी आज सकाळी फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला. पण त्यांनी तो स्वीकारला नाही. देसाई यांनीच ही माहिती माध्यमांना दिली.