कामे होत नसल्याने संतप्त शिवसेना मंत्री व आमदारांचा भाजपला सवाल

शिवसेनेच्या मंत्र्यांना दिलेली तुलनेने दुय्यम खाती, राज्यमंत्र्यांना अधिकारच नाही आणि भाजपच्या मंत्र्यांकडून आमदारांची कामेच होत नसल्याने शिवसेनेमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. काही मंत्री तर पद सोडण्याची भाषा खासगीत करू लागले असून कामे करता येत नाहीत व अधिकारच नसतील, तर सत्तेत राहायचे कशाला, अशी भावना शिवसेना नेत्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

विधिमंडळ अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना नेते, प्रतोद यांची बैठक बुधवारी रात्री झाली. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या मंत्र्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. जनतेच्या अपेक्षा मोठय़ा असून त्यांचे प्रश्न मांडले, तरी भाजपचे मंत्री शिवसेनेच्या आमदारांना किंमतच देत नाहीत व कामे करत नाहीत. राज्यमंत्र्यांचे अधिकार वाढवण्यात येतील, असे सांगूनही पुढे काहीच झालेले नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याचा कार्यभार अर्धवट दिल्याने एकनाथ शिंदे नाराज आहेत.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार?

या सर्व बाबी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालण्यात आल्या. ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यातून मार्ग काढणार असल्याचे सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.