लोकसभेच्या कामकाज पत्रिकेत भाजपचे नाना पटोले यांचा स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव दाखविण्यात आल्याने त्याचे पडसाद राज्य विधिमंडळांच्या उभय सभागृहांमध्ये उमटले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हा मुद्दा तापविला असला तरी कलंकित मंत्र्यांवरून लक्ष विचलित करण्याकरिता भाजपला हा मुद्दा फायद्याचाच ठरला. दुसरीकडे पटोले यांचा प्रस्ताव शुक्रवारी लोकसभेत दाखल झालाच नाही. गोंधळात शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते हे भाजप आमदाराच्या अंगावर धावून गेले.

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी औचित्याच्या मुद्दय़ाच्या माध्यमातून स्वतंत्र विदर्भाबाबत लोकसभेत सत्ताधारी भाजपचे सदस्य नाना पटोले यांनी मांडलेल्या खासगी स्वरूपाच्या ठरावाकडे लक्ष वेधले. कोणत्याही परिस्थितीत आम्ही महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, असा इशारा मुंडे व नारायण राणे यांनी दिला. भाजपचे खासदार पटोले यांच्या या प्रस्तावावरून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेने तर संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्दय़ावर टोकाची भूमिका घेण्याचा इशारा सुनील प्रभू यांनी दिला.

हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावरून तत्कालीन महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या विधानावरून गोंधळ झाला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही अणे यांच्या विधानावरून बराच गदारोळ झाला होता. सध्या कलंकित मंत्र्यांचा मुद्दा विरोधकांनी तापविला आहे. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा दोन-तीन दिवस चघळला जावा, असा भाजपचा प्रयत्न राहू शकतो. यातून कलंकित मंत्र्यांचा मुद्दा बाजूला पडेल, असे सत्ताधारी पक्षाचे गणित आहे. शिवसेनेलाही हा मुद्दा तापविण्यात अधिक रस आहे.

भ्रष्टाचाराराच्या मुद्यावरून अधिवेशात भजपची कोंडी करण्याचे काम विरोधकांकडून करण्यात येत असतानाच आज स्वतंत्र विदर्भाचे आयते कोलीत विरोधांच्या हाती मिळाले असून या मुद्दय़ावर शिवसेनेचीही साथ विरोधकांना मिळणार असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी काय भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

..आणि रावते भाजप आमदारावर धावून गेले

विधानसभेत स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावरून गदारोळ झाल्यानंतर अध्यक्षांनी कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब केले. या काळात भाजपच्या आमदारांनी स्वतंत्र विदर्भाची घोषणा दिल्या. या घोषणेमुळे संतप्त झालेल्या परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी भाजप आमदार रामचंद्र अवसारी यांच्या अंगावर धावून गेले. या दोघांमध्ये आता जुंपणार हे दिसताच महसूलमंत्री चंद्रकात पाटील तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मध्यस्थी करून प्रकरण चिघळू दिले नाही.