‘मार्ड’ने पुकारलेला डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला असला तरी रुग्णालयांतील समस्या संपुष्टात आलेल्या नाहीत. त्यामुळे पालिका रुग्णालयांमधील समस्या आणि एकंदर परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश शिवसेनेच्या नगरसेवकांना देण्यात आले असून ‘पहारेकऱ्या’ची भूमिका स्वीकारून शिवसेनेचे नगरसेवक आपापल्या विभागांतील रुग्णालयांतील रुग्ण, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेणार आहेत. त्याचबरोबर प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजवाणीवरही शिवसेनेचे पहारेकरी करडी नजर ठेवणार आहेत.

अस्वच्छता, असुरक्षितता, औषधांचा तुडवडा, देखभालीअभावी बंद पडणाऱ्या यंत्रसामग्री, डॉक्टर, परिचारीका आणि अन्य कर्मचाऱ्यांचे अपुरे संख्याबळ अशा एक ना अनेक समस्यांमुळे रुग्ण सेवेवर परिणाम होत आहे. पालिका प्रशासन दरवर्षी आरोग्य सेवेवर चार ते साडेचार हजार कोटी रुपये खर्च करते. परंतु असे असतानाही रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मुंबईकरांना उत्तम रुग्ण सेवा मिळावी, डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या दूर व्हाव्या, डॉक्टर आणि रुग्णांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण व्हावे आदी विविध गोष्टींचा आढावा घेण्याचे आदेश शिवसेनेच्या नगरसेवकांना देण्यात येणार आहेत.

डॉक्टरांच्या संपानंतर पालिका रुग्णालयांतील परिस्थिती चिघळली होती. मात्र प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेनंतर रुग्णालयांतील परिस्थिती निवळली आहे. मात्र आजही रुग्ण, डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत. या सर्व समस्या दूर होऊन रुग्णांना चांगली रुग्ण सेवा मिळावी, डॉक्टरांना चांगल्या वातावरणात काम करता यावे यादृष्टीने रुग्णालयांमध्ये बदल करण्याचा संकल्प शिवसेनेने सोडला आहे.

– यशवंत जाधव, सभागृह नेता