पालिकेने विक्रमी वेळेत उभारलेल्या मध्य वैतरणा धरणास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेतच चढाओढ लागली आहे. या धरणाला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेच्या खासदाराने केल्यानंतर आता राज्यमंत्र्यांनीही तिचा पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे या नामकरणाचे श्रेय लाटण्यावरुन शिवसेनेतच चढाओढ लागल्याची चर्चा पालिकेमध्ये दिवसभर सुरू होती.
मुंबईमधील नागरी कामांचे श्रेय लाटण्याबाबत सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये कायम धडपड सुरू असते. मात्र आता मध्य वैतरणालाच्या नामकरणाचे श्रेय मिळविण्यासाठी शिवसेनेत अंतर्गत चढाओढ सुरू झाली आहे.
या धरणाला बाळासाहेब ठाकेर यांचे नाव देण्यात यावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी गेला वर्षी केली होती. या मागणीवर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. असे असताना राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आता मध्य वैतरणाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. राज्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीचा प्रस्ताव मंगळवारी गटनेत्यांच्या बैठकीत सादर करण्यात आला होता.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मध्य वैतरणाला देण्यास आमचा कुठलाही विरोध नाही. पण शिवसेनेतील मंडळींच्या श्रेय लाटण्याच्या राजकीय वृत्तीला आमचा विरोध आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी यावेळी केली.

गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी..
मध्य वैतरणा धरणाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याबाबत रवींद्र वायकर यांनी पालिकेकडे सादर केलेल्या प्रस्तावाला सर्वपक्षिय गटनेत्यांनी मंगळवारी मंजुरी दिली. आता हा प्रस्ताव पालिका सभागृहात सादर करण्यात येणार आहे. सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर मध्य वैतरणाच्या नामकरणाचा मुहूर्त निश्चित करण्यात येणार आहे.