बेस्ट उपक्रमाप्रमाणेच मुंबईकरांच्या सुविधांसाठी पालिकेने उपनगरीय रेल्वेसाठी १५० कोटी रुपयांची मदत द्यावी. त्यासाठी आगामी वर्षांच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
उपनगरीय रेल्वे मार्ग ओलांडताना होणारे वाढते अपघात, पादचारी पुलांची कमी संख्या, फलाटांवर अपुऱ्या सुविधा, उपनगरांमध्ये पूर्व-पश्चिम परिसराला जोडणाऱ्या पुलांची रखडलेली कामे आदींमुळे प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. फलाटांची उंची आणि अन्य सुविधांचा अभाव यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. मुंबईकरांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी पालिकेने १५० कोटी रुपये निधी उपलब्ध करून रेल्वेला मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे केली आहे. खासदार, रेल्वे आणि पालिका अधिकाऱ्यांच्या संयुक्त समितीमध्ये आपण ही मागणी केली असल्याचे शेवाळे यांनी सांगितले. मुंबई रेल्वेला मदतीचा हात देण्याची तयारी आयुक्तांनी या बैठकीत दर्शविल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रेल्वे मार्गातील नाल्यांच्या सफाईसाठी पालिकेकडून रेल्वे प्रशासनाला निधी देण्यात येतो. त्याच धर्तीवर उपनगरीय रेल्वे स्थानकांवर सुविधा आणि पादचारी पूल उभारणीसाठी पालिकेने मदत करायला हरकत नाही. पालिकेच्या निधीतून उपलब्ध होणाऱ्या सुविधांचा प्रवाशांना दिलासा मिळू शकेल असे शेवाळे म्हणाले.