वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मराठी, गुजराती मतांचा लक्षणीय प्रभाव आहे. २००९च्या लोकसभा निवडणुकीत आणि नंतर विधानसभा निवडणुकीत मात्र, निवडणुकीचे नेमके व्यवस्थापन, मनसेमुळे झालेल्या मतांच्या विभागणीचा फायदा काँग्रेसने उचलला होता. काँग्रेसचे गुरुदास कामत त्या वेळी निवडून आले होते. तर विधानसभेच्या सहापैकी चार जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. आता मात्र लोकसभा निवडणुकीच्या मोदी लाटेत शिवसेनेचे गजानन कीर्तीकर यांनी सर्व सहा मतदारसंघांत आघाडी मिळवत काँग्रेसच्या गुरुदास कामत यांचा एक लाख ८३ हजार मतांनी पराभव केला. त्यामुळे आता या मतदारसंघातील काँग्रेसच्या ताब्यातील जागा खेचून घेण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असणार आहे. गुजराती मतांनी युतीला भरभरून मतदान केले. मनसेचा प्रभाव दिसलाच नाही. त्यामुळे आता दिंडोशी, अंधेरी पूर्व, वसरेवा या जागांवर जोर लावण्याचा शिवसेनेचा प्रयत्न राहणार आहे. दिंडोशीमध्ये पुन्हा एकदा विद्यमान महापौर सुनील प्रभू यांना उतरवून मागच्या पराभवाचा हिशेब चुकता करण्यासाठी शिवसेनला परिस्थिती पूरक आहे. तर वसरेव्यामध्ये चुरशीच्या लढतीची अपेक्षा आहे.
विधानसभा मतदारसंघांतील चित्र
गोरेगांव- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी मनसेचे आव्हान असतानाही २००९च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद राव यांचा सुमारे २५ हजार मतांनी पराभव करत निर्विवाद विजय मिळवला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेचे कीर्तीकर यांना गोरेगाव विधानसभा मतदारसंघात ४५ हजार मतांची आघाडी मिळाली. मतदारसंघावरील शिवसेनेचा प्रभाव, देसाई यांची पक्षनेतृत्वाशी असलेली जवळीक यामुळे आगामी निवडणुकीतही देसाई यांचा मार्ग सोपा आहे. प्रतिस्पर्धी कोण हाही प्रश्न आहे. कारण राष्ट्रवादीने जागा लढवली तरी शरद राव यांना पुन्हा संधी मिळेल की अन्य कोणी उमेदवार असेल याबाबत तर्कच सुरू आहेत.
जोगेश्वरी- शिवसेनेचे रवींद्र वायकर यांनी मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे भाई जगताप यांच्यासारख्या तगडय़ा प्रतिस्पध्र्यावर १४ हजार मतांनी मात केली. नगरसेवक म्हणून वायकर यांनी सातत्याने या भागात ठेवलेला जनसंपर्क  तेव्हा उपयुक्त ठरला. लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघात शिवसेनेला ४३ हजार मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे वायकर यांच्यासाठी पुन्हा एकदा परिस्थिती पोषक आहे. तर काँग्रेसच्या उमेदवारासाठी लोकसभा निवडणुकीतील सेनेची कामगिरी हे मोठे आव्हान असणार आहे. मनसे हा या मतदारसंघात काळजीचा विषय नाही.
दिंडोशी- मागच्या निवडणुकीत काँग्रेसचे राजहंस सिंग शिवसेनेच्या सुनील प्रभू यांच्यावर मात करत आमदार म्हणून निवडून आले. अर्थात काँग्रेसच्या विजयात मनसेमुळे मराठी मतांमध्ये झालेल्या विभागणीचा वाटा हेच कारण होते. या वेळी मात्र लोकसभेत शिवसेनेचा खासदार असल्याचा आणि मोदी लाटेचा फायदा घेत काँग्रेसकडून हा मतदारसंघ खेचून घ्यायचा असा शिवसेनेचा निर्धार आहे. प्रभू सध्या मुंबईचे महापौरही आहेत. त्यामुळे आपल्या मतदारसंघात त्यांना विकासकामे करण्याची आणि विशेष लक्ष घालण्याची चांगली संधी आहे. लोकसभा निवडणुकीत २९ हजार मतांची आघाडी घेत सेनेने वातावरण तयार केले आहे.
वर्सोवा- काँग्रेसचे बलदेव खोसा यांनी मागच्या निवडणुकीत शिवसेनेचे यशोधर फणसे यांचा १२ हजार मतांनी पराभव केला. आताच्या लोकसभा निवडणुकीतही इतर मतदारसंघात कीर्तीकर यांना घसघशीत आघाडी मिळत असताना वसरेवामध्ये कीर्तीकर यांना ११ हजारांच्या मताधिक्यावर समाधान मानावे लागले. खोसा यांच्यासाठी ही थोडीशी आशादायक बाब आहे. सीआरझेडच्या नियमामुळे कोळीवाडय़ांचा रखडलेला विकास हा मुद्दा या निवडणुकीत महत्त्वाचा ठरेल. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे.
अंधेरी (प.)- मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अशोक जाधव यांनी सेनेच्या उमदेवाराचा तब्बल ३२ हजार मतांनी पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत शिवसेनेला यथे ३२ हजारांची आघाडी मिळाली. मेट्रो रेल्वेसारखा प्रकल्प या मतदारसंघातून जातो. त्याचे श्रेय  तसेच काँग्रेसला अनुकूल अशा उत्तर भारतीय आणि मुस्लीम मतांचे एकूण प्रमाण ३१ % आहे.
अंधेरी (पूर्व)- काँग्रेसचे सुरेश शेट्टी यांनी मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे रमेश लटके यांचा पराभव केला होता. शेट्टी यांना पाच हजार मतांची आघाडी मिळाली होती. तर मनसेच्या उमेदवाराने २५ हजार मते मिळवली होती. तशात आताच्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेने २३ हजार मतांची आघाडी घेतली होती. लोकांची कामे करणे, चांगला जनसंपर्क यामुळे शेट्टी यांच्याबद्दल विरोधी पक्षातही चांगली प्रतिमा आहे. शिवाय सुमारे २५ टक्के मुस्लिम, ११ टक्के उत्तर भारतीय, सहा टक्के दक्षिण भारतीय या धार्मिक, भाषिक समीकरणांचाहा शेट्टी यांना मोठा आधार आहे.
दिग्गजांची कसोटी
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. सुरेश शेट्टी यांच्यासारखा मातब्बर उमेदवार काँग्रेसकडून रिंगणात असणार आहे. शेट्टी यांची प्रतिमा चांगली आहे. जनसंपर्क चांगला आहे. मागच्या वेळी त्यांच्या विजयात मनसेचा वाटा असल्याने शेट्टी यांच्या वैयक्तिक कामगिरीला संघटनात्मक ताकदीच्या जोरावर आव्हान देण्याची तयारी शिवसेना करत आहे. शेट्टी, अशोक जाधव व खोसा यांच्या प्रस्थापित मतदारसंघात शिवसेनेला विजयासाठी कडवा संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे, भाजपची प्रामाणिक साथ किती मिळते, यावरही सेनेचे भवितव्य विसंबून आहे.