शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद नाही; मित्र पक्षांना दुय्यम स्थान

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार भाजपच्या पुण्यात १८, १९ जूनला होणाऱ्या प्रदेश कार्यकारिणीनंतर लगेचच एक-दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला मात्र कॅबिनेट मंत्रिपद अथवा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी दिली जाणार नसल्याचे समजते. शिवसेनेच्या टीकेमुळे भाजपश्रेष्ठी नाराज असून, शिवसेनेला आता अधिक काहीही देण्याची भाजपची तयारी नाही. त्यामुळे भाजप व शिवसेनेत महामंडळांचे वाटपही पूर्ण झालेले नसून ते मंत्रिमंडळ विस्तारानंतर पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्रिपद देऊन बोळवण करण्याचा भाजपचा विचार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या अनेक महिन्यांपासून नुसताच चर्चेत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर आता तातडीने करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावले टाकली आहेत. मात्र भाजपची प्रदेश कार्यकारिणी १८ व १९ जूनला पुण्यात होत असून, तोपर्यंत तरी विस्तार होणार नाही. मात्र कार्यकारिणीच्या बैठकीनंतर २० किंवा २१ जूनला मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेने एक कॅबिनेट मंत्रिपद, दोन राज्यमंत्रिपदे व महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली होती. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह अन्य नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांवर गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. आगामी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावरच लढवायची असल्याने शिवसेनेला कोणतेही आणखी लाभ देऊ नयेत, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे दोन दुय्यम खात्यांच्या राज्यमंत्रिपदांव्यतिरिक्त शिवसेनेला फारसे काहीही मिळण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

 मोदी-शहांशी चर्चेनंतरच निर्णय

भाजपच्या मंत्र्यांची नावे मुख्यमंत्र्यांनी जवळपास निश्चित केली असून, पंतप्रधान मोदी व अध्यक्ष अमित शहा यांच्याशी या आठवडय़ात चर्चा होऊन त्यावर शिक्कामोर्तब होईल. महादेव जानकर व सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्रिपदे देण्याचा भाजपचा मानस असला तरी त्यांचा कॅबिनेट मंत्रिपदासाठी हट्ट आहे. त्याचबरोबर  खातेवाटपाबाबत मुख्यमंत्री पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत.

खात्यांमध्ये फेरबदल?

* राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये विद्यमान मंत्र्यांच्या खात्यांमध्ये काही फेरबदल होण्याची शक्यता

* नवीन मंत्र्यांना विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी खात्याचा अभ्यास व तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी आवश्यक असल्याने विस्तार लगेचच होणार