कोकणातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरून शिवसेनेचे मंत्री वेगवेगळी भूमिका घेत असून, पक्षाची नक्की भूमिका कोणती हेच स्पष्ट होत नाही. सत्तेसाठी हपापलेल्या शिवसेनेची जैतापूरबाबत दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीने शुक्रवारी केला.
जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा नव्हे तर स्थानिकांचा विरोध आहे, असे शिवसेनेचे एक मंत्री सांगतात. दुसरे मंत्री आणखी वेगळे सांगतात. नेमकी शिवसेनेची भूमिका काय आहे, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. शिवसेनेने या मुद्दयावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.
आर. आर. पाटील यांनी ग्रामीण विकासमंत्री असताना संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान सुरू केले होते. नव्या सरकारने या अभियानाचे नाव बदलून संत गाडगेबाबांचा अपमान केल्याचा आरोप तटकरे यांनी केला. अमिर खानचा स्वच्छतेशी संबंध काय, असा सवालही केला.
पदाधिकाऱ्यांमध्ये तरुणांना प्राधान्य
प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड झाल्यावर तटकरे यांनी १६ पदाधिकाऱ्यांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर केली. रणजितसिंह मोहिते-पाटील, संजीव नाईक, डॉ. राजेंद्र िशगणे, प्रमोद हिंदुराव, आनंद परांजपे, सारंग पाटील, अमरसिंह पंडित आदी युवकांना संधी देण्यात आली आहे. डॉ. भारती पवार या एकमेव महिलेचा यादीत समावेश आहे.