येळ्ळूरमध्ये मराठी भाषकांना कर्नाटक पोलिसांनी केलेली मारहाण म्हणजे ‘कानडी दहशतवाद’ असल्याचे विधान शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रात करण्यात आले आहे. तसेच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मोदी सरकारकडून योग्य कारवाईची अपेक्षाही शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबईत कर्नाटक संघ व कर्नाटक भवनाच्या इमारती दिमाखात उभ्या आहेत, पण बेळगावात ‘महाराष्ट्र राज्याचा’ बोर्ड सरकारी बळजबरीने तोडला जातो हा मस्तवालपणा आहे आणि झालेला प्रकार हा हाफीज सईदइतकाच भयंकर दहशतवाद असल्याचे शिवसनेने म्हटले आहे.
महाराष्ट्र सदनातील ‘चपाती’ प्रकरणावरून विरोधकांनी निषेध व्यक्त केला आणि पक्षास जातीय ठरवण्याचा प्रयत्न केला मग, कर्नाटकात मराठी भाषकांवर झालेल्या अत्याचारावर विरोधक कोणती भूमिका ठेवणार? असा सवालही शिवसेनेने विचारला आहे. तसेच महाराष्ट्रातील विद्यमान राज्यकर्ते अकार्यक्षम असल्याने त्यांच्याकडून कर्नाटकातील मराठी भाषकांनी न्यायाची अपेक्षा ठेवून काहीच उपयोग नसल्याचेही म्हणत आघाडी सरकारवर सेनेने निशाणा साधला. तर, मोदी यांच्या रूपाने एक मजबूत पंतप्रधान व राजनाथ सिंह यांच्या रूपाने एक कणखर गृहमंत्री देशाला लाभला आहे. त्यामुळे याच कणखर नेतृत्वाकडून आता अत्याचारग्रस्त सीमा बांधवांना आशा उरल्या असल्याचे म्हणत केंद्राकडून योग्य न्यायाची मागणी केली आहे.