पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम उधळण्याचा इशारा शिवसेनेने दिला होता तरी सरकारने चोख बंदोबस्त ठेवल्याने हा कार्यक्रम सुरळीत पार पडला. परिणामी शिवसेनेवर कुरघोडी केल्याचे समाधान भाजपला मिळाले असावे, पण शिवसेनेला यापूर्वीही राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या वेळी असाच अनुभव आला होता.

राहुल गांधी यांच्या मुंबईभेटीला शिवसेनेने विरोध केला होता. मुंबई ही साऱ्या भारतीयांची आहे, असे विधान केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने राहुल यांना काळे झेंडे दाखविण्याबरोबरच दौरा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. शाहरूख खानच्या चित्रपटालाही शिवसेनेने विरोध केला होता, पण पोलीस बंदोबस्तानंतर चित्रपट प्रसारित झाला होता.

पाकिस्तानबरोबरचा क्रिकेट सामना वानखेडे स्टेडियमवर होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला आणि शिशिर शिंदे यांनी मैदानात जाऊन खेळपट्टी उखडली होती. असे अनेक प्रकार घडले आहेत. आता सेनेचा धाक कमी झाल्याचे चित्र आहे.