शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असताना काँग्रेसचे नेते नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेना हा त्रासलेला पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राग काढता येत नाही म्हणून ते सर्वसामान्यांवर राग काढतात, असे ते म्हणाले.

 

रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. तर गायकवाड यांनी त्यांच्या कृत्याबद्दल माफी मागण्यास नकार दिला आहे. तर एअर इंडियानेही गायकवाड यांना ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकले आहे. एअरलाईन असोसिएशनकडूनही गायकवाड यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. तसेच एअर इंडियाकडून संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आम्ही संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती तयार केली आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

एअर इंडियाने रवींद्र गायकवाड यांचे आज संध्याकाळचे तिकीट रद्द केले आहे. तर देशातील सर्वच एअरलाईन्सने गायकवाड यांच्यावर बंदी घातली आहे. ‘मी काहीही चुकीचे केलेले नाही. त्यांनी माझ्याशी गैरवर्तन केले आहे,’ असे रवींद्र गायकवाड यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला सांगितले. एअर इंडियाने माझ्याविरोधात कारवाई करुन दाखवावी, असे आव्हान गायकवाड यांनी दिले आहे. ‘त्यांनी कारवाई करावी. त्यांनी न्यायालयात जाऊन खटला दाखल करावा. मी दंड भरण्यास तयार आहे,’ असे गायकवाड यांनी सांगितले. तर पक्षाने समन्स बजावण्यात आल्याची माहितीही गायकवाड यांनी दिली आहे. माझ्यावर काय कारवाई करायची, ते उद्धव ठाकरे ठरवतील. मला पक्षाच्या कार्यालयात बोलवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी गायकवाड यांच्या कृत्यावर प्रतिक्रिया दिली आहे. गायकवाड लोकप्रतिनिधी आहेत. खासदार आहेत. आमदार असो की मंत्री त्यांनी पटकन हिंसक होणे योग्य नसल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणात कुणाची चूक आहे हे पाहायला हवे, असेही शिंदे म्हणाले. तसेच त्यांच्यावर कारवाईबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असेही ते म्हणाले. तर काँग्रेसचे नेते नितेश राणे यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेना हा त्रासलेला पक्ष आहे. मोदी आणि फडणवीस यांच्यावरील राग ते लोकांवर काढतात, असे ते म्हणाले आहेत. तर गायकवाड यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केली आहे.