खातेवाटपावरून खदखद असली तरी पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांमध्ये शिवसेनेने मागणी केलेल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांची पालकमंत्रीपदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेकडे सोपविली आहेत. ठाणे, कोकण आणि मराठवाडय़ातील आपल्या प्रभाव क्षेत्रातील जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिळविण्यात शिवसेना यशस्वी झाली. आपल्या प्रभाव क्षेत्रात भाजपने हस्तक्षेप करू नये हे शिवसेनेचे खरे दुखणे होते.  
पालकमंत्रीपदाच्या माध्यमातून त्या जिल्ह्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. राजकीयदृष्टय़ा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचे असते. भाजप सरकारमध्ये सहभागी होताना शिवसेनेला तुलनेत दुय्यम दर्जाची मंत्रिपदे देण्यात आली. पण पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करताना शिवसेनेच्या मागणीप्रमाणे ते ते जिल्हे सोपविण्यात आले आहेत. ठाणे, मुंबई शहर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, यवतमाळ, भंडारा आणि धुळे या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद शिवसेनेच्या वाटय़ाला आली आहेत.
सहा महानगरपालिका असलेला ठाणे जिल्हा शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेला रोखले होते. विधानसभेच्या १८ जागा असलेल्या या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी दावा केला होता. भाजप वाढणे शिवसेनेसाठी धोक्याचा इशारा असल्यानेच शिवसेनेने सारी प्रतिष्ठा पणाला लावून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळविले आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यावर शिवसेनेची नजर होती, पण शहरचे पालकमंत्रीपद मिळाले आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयांवर नियंत्रण ठेवणे शिवसेनेसाठी आवश्यक होते. नारायण राणे यांचा पराभव झाला असला तरी त्यांना राजकीयदृष्टय़ा संपविणे हे शिवसेनेचे लक्ष्य आहे.
मराठवाडय़ातील औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये ताकद वाढविण्यासाठी शिवसेनेने या जिल्ह्यांची पालकमंत्रीपदे मागून घेतली आहेत. भविष्यात मराठवाडय़ात चांगले यश मिळविण्याचे शिवसेनेचे उद्दिष्ट आहे.
एकूणच आपल्या प्रभाव क्षेत्रातील जिल्ह्यांचे नियंत्रण भाजपच्या हाती जाणार नाही याची खबरदारी शिवसेनेने घेतली आहे.
कदम कोकणातून हद्दपार
रत्नागिरीच्या पालकमंत्रीपदी मुंबईतील रविंद्र वायकर यांची नियुक्ती करून शिवसेनेने ज्येष्ठ मंत्री रामदास कदम यांना कोकणातून हद्दपार केले आहे. केंद्रीयमंत्री अनंत गिते यांच्याशी कदम यांचे अजिबात जमत नाही. कदम यांना कोकणात लक्ष घालू नये, असाच संदेश शिवसेना नेतृत्वाने दिला आहे. रामदास कदम यांच्याकडे औरंगाबादची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मराठवाडय़ाचे संपर्क नेते म्हणून काम केलेल्या दिवाकर रावते यांच्याकडे परभणी आणि नांदेडची जबाबदारी सोपविण्यात आली. रावते यांना औरंगाबादपासून पद्धतशीरपणे दूर ठेवण्यात आले आहे. कारण स्थानिक नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी त्यांचे फार जमत नाही.