शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्कवर स्मारक करण्यावरून निर्माण झालेला वाद ‘अकारण’ असून कोणीही तो करू नये आणि मी त्यात पडणार नाही. या विषयात वाद घालण्यासारखे काहीही नाही, असे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ मुखपत्रात दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केल्यानंतर शिवाजी पार्कवरच स्मारक व्हावे यासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. स्मारकासाठी शिवाजी पार्कऐवजी अन्य जागेचा शोध सुरू केल्याचे वक्तव्य करून पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या नव्या भूमिकेचे संकेत दिल्याने स्मारकाचा वाद संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.
बाळासाहेबांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात जेथे अंत्यसंस्कार झाले, त्याच जागी त्यांचे स्मारक व्हावे यासाठी स्वत: राऊत आणि मनोहर जोशी हे आग्रही होते. या मागणीसाठी प्रसंगी कायदा हातात घेण्याची तयारी शिवसैनिकांनी करावी, असा सूर मनोहर जोशी यांनी काढला; तर ही जागा अयोध्येइतकीच पवित्र असल्याने सरकार वा न्यायालयाने या मागणीआड येऊ नये, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला. मात्र कायद्यापलीकडे जाऊन काहीही होणार नाही, असा कठोर पवित्रा घेत ती जागा मोकळी करण्याच्या हालचालीच सरकारी पातळीवर सुरू झाल्याने शिवसेनेचा पवित्रा काहीसा थंडावला आहे. बाळासाहेबांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्काराच्या वेळी उभारलेला चौथरा हटविण्यासंदर्भात मुख्य सचिव,
गृह सचिव, पोलीस आयुक्त आणि संबंधित उच्चपदस्थांची बैठक शनिवारी पार पडली. शिवसेनेने सामंजस्याची भूमिका घेऊन चौथरा व मंडप न हलविल्यास कारवाई करण्यासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात उद्धव ठाकरेंशी चर्चाही केल्याचे समजते.
या पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी स्मारकाचा वाद अकारण असल्याचे म्हटल्याने शिवाजी पार्कऐवजी ते अन्यत्र होईल, असे दिसत आहे. अंत्यसंस्काराची जागा लाखो शिवसैनिकांसाठी अतिशय पवित्र आहे. पण शिवाजी पार्कवर स्मारक करण्यात अडचणी असल्याने शिवसेनेने दादर ते वांद्रे परिसरात अन्यत्र जागेचा शोध सुरू केला आहे, असे शिवसेना नेत्यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार शिवाजी पार्कवर स्मारक करण्यात अनेक कायदेशीर अडचणी येतील. उच्च न्यायालयातही लढाई करावी लागेल. त्यात बराच काळ जाईल आणि शिवसेनेची अडचणही होईल.     
अन्य जागेत भव्य स्मारकाचा विचार
शिवाजी पार्कवर स्मारकाचा मुद्दा प्रतिष्ठेचा करून वाद घालण्यापेक्षा अंत्यसंस्काराच्या जागेत छोटासा चौथरा आणि अन्य जागेत भव्य स्मारक उभारण्याचा शिवसेनेचा विचार आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवरील चौथरा व मंडप लवकरच हालविण्यात येईल, अशी शक्यता आहे.