कालबद्ध अंमलबजावणीचा उद्धव ठाकरे यांचा आग्रह

महापालिका निवडणुकीच्या वचननाम्यात दिलेली आश्वासने आगामी अर्थसंकल्पातच पूर्ण व्हावी, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच मैदानात उतरले आहेत. वचननाम्याची कालबद्ध अंमलबजावणी करण्यात यावी, भूमिका ठाकरे यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे मांडली आहे. इतकचे नव्हे तर मार्चमध्ये मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात सेनेचा वचननामा प्रतिबिंबित होईल यासाठी उद्धव यांनी जोर लावला आहे.

मुंबई व ठाणे महापालिकेत संपूर्ण सत्ता मिळूनही ठोस कामे न झाल्यास त्याचा फटका आगामी विधानसभेत बसेल हे लक्षात घेऊन शिवसेनेने पहिल्यापासून कालबद्धरीत्या वचननाम्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून उद्धव ठाकरे यांच्याकडून त्याचा नियमित आढावाही घेतला जाणार आहे.

महापालिका निवडणुकीत ‘करून दाखवले’ विरुद्ध ‘पारदर्शी कारभार’ अशी शिवसेना व भाजपमध्ये जोरदार लढाई झाली होती. शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध करताना जी कामे आम्ही करू शकतो तीच वचननाम्यात दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. शिवसेनेचा महापौर झाल्यानंतर उद्धव ठाकरे, महापौर व पालिक आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची महापौर निवासस्थानी एक बैठक झाली होती. या बैठकीत शिवसेनेने दिलेल्या वचननाम्याची कालबद्ध अंमलबजावणी करण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. तसेच ही अंमलबजावणी योग्य प्रकारे होत अथवा नाही हे पाहण्याची जबाबदारी महापौर, सभागृह नेते व स्थायी समिती अध्यक्षांवर सोपविण्यात आली आहे. पालिकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्यामुळे पाच वर्षांत वचननाम्यातील सर्व कामे करून घेण्याचे निश्चित करण्यात आले असून आयुक्त मेहता यांनीही ती भूमिका मान्य केल्याचे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी सांगितले.वास्तववादी अर्थसंकल्प सादर करण्याची भूमिका शिवसेनेने घेतल्यामुळे भांडवली कामांवर अनावश्यक खर्च दाखवला जाणार नाही. आयुक्तांनी स्थायी समितीत अर्थसंकल्प मांडताना त्यामध्ये वचननाम्यातील कामे न घेतल्यास सभागृहाच्या माध्यमातून वचननाम्यातील कामे मंजूर करून घेतली जाणार आहेत. तथापि आयुक्तांनी कालबद्ध वचननामा अंमलबजावणी करण्याचे मान्य केल्यामुळे तशी वेळ येणार नाही, असे यशवंत जाधव यांनी सांगितले.

शिवसेनेची वचने

  • ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र
  • पालिका शाळांत शिकलेल्यांना मनपात प्राधान्याने नोकरी
  • शालेय गणवेश असलेल्या विद्यार्थ्यांना बेस्टमधून मोफत प्रवास
  • मुंबईतील रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी स्थानक उभारणी
  • चार मोठे जलतरण तलाव
  • पालिका रुग्णालयात जेनरिक औषधांची व्यवस्था
  • सागरी पर्यटन, उद्याने, मैदाने, ई-वाचनालय, कौशल्य विकास, पालिका संगीत अकादमी आदी सुविधा
  • कोस्टल रोड
  • खड्डय़ांचा प्रश्न कायमचा निकाली काढणे