शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तुलना महात्मा गांधी यांच्यासोबत केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरुन सुभाष देसाई यांनी ही तुलना केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक दादरमधील शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागेत उभारले जाणार आहे. यामुळे महापौरांचे निवासस्थान भायखळ्यात हलवण्यात आले आहे.

‘कोणत्याही घटनात्मक पदावर नसताना महात्मा गांधी यांचे स्मारक उभारले जाते, मग बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक का उभारु नये ?’ असा सवाल सुभाष देसाई यांनी उपस्थित केला. पत्रकारांशी बोलताना स्मारकावरुन प्रश्न उपस्थित करत देसाई यांनी महात्मा गांधी आणि बाळासाहेब ठाकरे यांची तुलना केली. ‘ज्यावेळी कोणत्याही महान नेत्याच्या स्मारकाच्या उभारणीची चर्चा होते, त्यावेळी आक्षेप नोंदवले जातात,’ असेदेखील सुभाष देसाई यांनी म्हटले.

‘लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहेत. बाळासाहेब ठाकरे महान नेते होते. शिवसैनिकांप्रमाणेच सामान्य जनतेलाही बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व्हावे असे वाटते. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव होईल. म्हणूनच सरकारने त्यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यात काहीच चुकीचे नाही,’ असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले. बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तीमत्त्वाची उंची कोणत्याही मापदंडात मोजली जाऊ शकणार नाही, असेदेखील देसाई यांनी पत्रकारांना सांगितले.

‘बाळासाहेब ठाकरे यांनी घटनात्मक पद भूषवले होते का?, असा प्रश्न विचारला जातो. याला उत्तर देताना महात्मा गांधी यांनी तरी घटनात्मक पद भूषवले होते का?, असा प्रतिप्रश्न मी विचारेन. त्यांनी (महात्मा गांधी) कोणतेही घटनात्मक पद भूषवले नसताना विविध सरकारांनी त्यांची स्मारके उभारली आहेत. त्यावेळी कोणी आक्षेप घेतल्याचे मी ऐकलेले नाही. ते योग्यदेखील नाही,’ असेदेखील सुभाष देसाई यांनी पुढे बोलताना म्हटले. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविषयी घेण्यात येणाऱ्या आक्षेपांना राज्य सरकारकडून उत्तर दिले जाईल , असे देसाई यांनी सांगितले. दरम्यान बाळासाहेब ठाकरे आणि महात्मा गांधी यांची तुलना अपमानास्पद असल्याचे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अल नासेर झकेरिया यांनी म्हटले आहे.