विधानसभा निवडणुकीतील भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार संजय पांडे यांच्या कार्यालयात जाऊन खंडणीसाठी धमकी दिल्याचे माझ्यावरील आरोप निखालस खोटे असून त्याची चौकशी होईपर्यंत मी आमदारकीची शपथ घेणार नाही, असा आशयाचे निवेदन आमदार प्रताप सरनाईक यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे.
२९ ऑक्टोबर रोजी मतदार संघाच्या पहाणी दौऱ्यात स्थानिक नागरिकांनी आपल्याकडे नगरसेवक संजय पांडे यांनी अनधिकृत बांधकामे केल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार चौकशी करून कारवाई करण्याबाबतचे पत्र ३० ऑक्टोबर रोजी मी महापालिका आयुक्तांना दिले होते.
शुक्रवारी ३१ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभासाठी मुंबईत जात असताना वर्तकनगर पोलीस ठाण्यात माझ्याविरूद्ध खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाल्याचे समजले, असे सरनाईक यांनी पत्रात नमूद केले आहे. कोणताही पुरावा नसताना खंडणी तसेच ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल करण्यामागे माझा बदनामी करण्याचा डाव असल्याचा दावाही प्रताप सरनाईक यांनी या वेळी बोलताना  केला आहे.