खासदार – डॉ. श्रीकांत शिंदे (शिवसेना)
कल्याणमध्ये योग्य उमेदवार सापडत नसताना आणि स्वत:ला लोकसभा निवडणूक लढवावी लागू नये म्हणून शिवसेना जिल्हा नेते एकनाथ शिंदे यांनी आपले पुत्र डॉ. श्रीकांत यांना रिंगणात उतरविले. मोदीलाटेत शिंदे पुत्र चांगल्या मताधिक्याने विजयी झाले. उच्चशिक्षित डॉ. शिंदे यांच्याकडून मतदारांच्या बऱ्याच अपेक्षा होत्या, पण ते शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांच्या गोतावळ्यात अडकून पडले. मतदारसंघातील समस्या सोडविण्यात ते फारसे सक्रिय दिसले नाहीत किंवा स्वत:ची अशी छाप पाडू शकले नाहीत. या मतदारसंघात रेल्वेचा मुख्य विषय आहे. दिवा रेल्वे स्थानकात मध्यंतरी हिंसक आंदोलन झाले होते. एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून उपाय योजण्याचे आश्वासन दिले, पण हा प्रश्न अजूनही तसाच आहे. कल्याण टर्मिनसचा मुद्दा श्रीकांत शिंदेंनी लावून धरला आहे.
श्रेय लाटण्याचा प्रकार – आनंद परांजपे (राष्ट्रवादी काँग्रेस)
खासदारांच्या वर्षभरातील कामाकडे पाहिल्यास एकही प्रकल्प साकार होत असल्याचे दिसत नाही. आपल्या खासदारकीच्या काळात मंजूर झालेल्या प्रकल्पांची सुरुवात आता होत असून त्याचे केवळ श्रेय लाटण्याचा प्रकार होत आहे. नवा प्रकल्प मात्र सुरू झालेला निदर्शनास आलेला नाही. दिवा स्थानकाचा प्रश्नसुद्धा ‘जैसे थे’ आहे. केवळ महोत्सवांचे आयोजन करून नागरिकांना मनोरंजनात गुंतून ठेवून सत्ता हाती ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सध्या केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येसुद्धा सत्ता असूनही खासदारांना त्याचा फायदा घेऊन कामे करता आलेली नाहीत.

रेल्वेच्या प्रश्नांवर भर – श्रीकांत शिंदे
ठाण्यापलीकडच्या रेल्वे स्थानकांवर विशेष भर देण्याचा प्रयत्न वर्षभरामध्ये केला, तसेच कल्याण टर्मिनसचा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेच्या वतीने देशभरातील दहा टर्मिनसचा विकास करण्यात येणार असून, त्यामध्ये ठाकुर्लीचा समावेश आहे. मलंगगडावरील पाण्याची समस्या सोडवण्याबरोबरच तेथील पर्यटन विकासाच्या दृष्टीने सुशोभीकरण आणि विकासावर भर देण्यात आला आहे. दिव्याच्या उद्रेकानंतर रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन दिवा स्थानकात जलद गाडी थांबविण्याची मागणी करण्यात आली असून ती मंजूर होऊन पुढील तीन महिन्यांमध्ये या स्थानकावर गाडी थांबू शकणार आहे. कल्याण पूर्वेतील नागरिकांना रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन तेथील स्थानकापर्यंत रस्त्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
जयेश सामंत