वांद्रे टर्मिनस येथे आयोजित रेल्वेच्या कार्यक्रमाचे निमंत्रण उशिरा मिळाल्याने बुधवारी शिवसेना खासदार आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे कार्यक्रम लांबणीवर पडला. मात्र अशातही भाजपा आमदार आशीष शेलार यांनी रेल्वे फलाटाचे आणि आरक्षण कार्यालयाचे उद्घाटन पार पाडल्याने शिवसेना भाजपामधील वादाचे रंग या कार्यक्रमावर पाहायला मिळाले. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर राजकारण तापवले जात असल्याचा आरोप करण्यात आला.
वांद्रे टर्मिनस येथील फलाट आणि तिकीट आरक्षण कार्यालयाचे, कांदिवली स्थानकांतील स्वयंचलित जिन्याचे आणि गोरेगाव स्थानकांतील तीन स्वयंचलित जिन्याच्या कामांचे उद्घाटन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फरंन्सींगद्वारे करण्यात आले. या कार्यक्रमाचे निमंत्रण शिवसेना खासदारांना मंगळवारी रात्री उशिरा मिळाल्याने खासदार अरिवद सावंत यांनी नाराजी व्यक्त करत केली. यावेळी खासदार राजन विचारे देखील उपस्थित होते. दरम्यान रेल्वे अधिकाऱ्यांनी सावंत यांना व्यासपीठावर बोलावले असता त्यांनी व्यासपीठावर येण्यास नकार दिला.