एका प्रभाग समितीवर मनसेचे दिलीप लांडे

मुंबई महापालिकेतील एल प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने मनसेच्या ‘राजा’ला साथ देत आपल्या उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडले. त्यामुळे मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांची एल प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झाली. शिवसेनेने आयत्या वेळी माघार घेत मनसेला मदत केल्यामुळे युतीचे नवे संकेत मिळू लागले आहेत. भाजपला वचक बसावा म्हणून शिवसेनेकडून ही खेळी खेळण्यात आल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती.

पालिकेच्या सात प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका बुधवारी पार पडल्या. एल प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने नगरसेविका प्रविणा मोरजकर यांना, तर राष्ट्रवादी काँग्रेसने नगरसेविका सईदा खान यांना उमेदवारी दिली होती. मनसेचे गटनेते, नगरसेवक दिलीप लांडे यांनीही या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. या प्रभाग समितीमध्ये शिवसेनेचे पाच, भाजपचे दोन, काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, मनसेचे तीन आणि अपक्ष एक असे बलाबल आहे. अपक्ष नगरसेवकाने आयत्या वेळी आपल्या पारडय़ात मत टाकले नाही तर पराभवाचे धनी व्हावे लागेल हे ओळखून शिवसेनेने मनसेला छुपा पाठिंबा दिला आणि मोरजकर यांना उमेदवारी मागे घेण्याचे आदेश देण्यात आले. राष्ट्रवादीनेही सईदा खान यांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. त्यामुळे दिलीप लांडे विजयी झाले.

अन्य ठिकाणीही बिनविरोध

के-पूर्व प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उज्ज्वला मोडक यांच्या विरोधात काँग्रेसच्या सुषमा कमलेश राय यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे राय यांनी माघार घेतली. त्यामुळे उज्ज्वला मोडक बिनविरोध निवडून आल्या. तसेच जी-उत्तर प्रभागात शिवसेनेचे मिलिंद वैद्य, एच-पूर्व आणि एच-पश्चिम प्रभागात शिवसेनेचे संजय अगलदरे, के-पश्चिम प्रभागात भाजपचे योगीराज दाभाडकर, एम-पश्चिम प्रभागात भाजपच्या सुषमा सावंत, एन प्रभागात शिवसेनेचे तुकाराम पाटील, एस आणि टी प्रभागात भाजपच्या समिता कांबळे विजयी झाले.