अविश्वास ठरावाची सेनेची हालचाल

सत्तेत असूनही शिवसेना व महापौरांना वगळून आयुक्त एकटय़ाने कारभार करत असल्याचा आरोप करत शिवसेना आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव आणत असल्याची चर्चा शुक्रवारी महापालिका मुख्यालयात रंगली होती. मुख्यालयात आलेल्या खासदार राहुल शेवाळे यांच्या वक्तव्यामुळे या चर्चेला सुरुवात झाली.

घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रदर्शनाच्या कार्यक्रमाची माहिती आयुक्तांकडून महापौरांना देण्यात आली नाही. त्याचप्रमाणे सायकल ट्रॅकचे सादरीकरण आयुक्तांनी महापौरांना न दाखवता थेट मुख्यमंत्र्यांना दाखवले. जकात विभागातील कर्मचाऱ्यांना इतर विभागांत सहभागी करून घेताना लॉटरी पद्धतीला महापौरांनी केलेला विरोधही आयुक्तांनी मानला नाही. त्यामुळे सेनानेते संतप्त झाले आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाच्या कार्यक्रमालाही निमंत्रण असूनही महापौर महाडेश्वर यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यामुळे पालिकेत एका नव्या वादाची ठिणगी पडली आहे.

मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी शिष्टाचार राखला पाहिजे. मुंबईचे महापौर हे मुंबईचे प्रथम नागरिक आहेत, त्यांचा अपमान म्हणजे मुंबईकरांचाच अपमान आहे. त्यांना डावलले जात असेल तर आयुक्तांवर अविश्वास ठराव आणायला हरकत नाही.

– राहुल शेवाळे, शिवसेना खासदार

‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला. पालिकेने मुख्यमंत्र्यांबरोबर बोलून कार्यक्रम ठरवला. एक दिवस आधी मला फोन वरून कळवण्यात आले. मला निमंत्रण पत्रिका पोहोचली नव्हती, म्हणून मी कार्यक्रमाला गेलो नाही. त्याचप्रमाणे धोरणात्मक निर्णय घेताना सत्ताधारी म्हणून आयुक्तांनी आमच्याशी चर्चा करायला हवी.

– विश्वनाथ महाडेश्वर, महापौर