शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प वेगाने पुढे रेटला जात असल्याने अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने आता मुंबईत आंदोलन सुरू करण्याचे ठरविले आहे. देशी-विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबईत ‘मेक इन इंडिया’ सप्ताह आयोजित करण्यात आला असताना विदेशी गुंतवणूक असलेल्या जैतापूर प्रकल्पाविरोधात शिवसेना आक्रमक होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून आंदोलनाची तारीख दोन-तीन दिवसांमध्ये ठरविण्यात येईल, असे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असून पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. कोकणासाठी हा अणुऊर्जा प्रकल्प धोकादायक असून स्थानिक रहिवाशांचाही त्याला विरोध आहे. पण पोलिसी बळाच्या जोरावर हा विरोध दडपण्यात येत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. पंतप्रधानांना निवेदन देऊनही त्यानंतर त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही किंवा अजूनपर्यंत शिवसेनेला काहीही कळविलेले नाही. तज्ज्ञांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन शिवसेनेला देण्यात आले होते, पण शिवसेनेला न जुमानता प्रकल्पाचे काम सुरू ठेवण्यात आले आहे. शिवसेनेने दोन आठवडय़ांपूर्वीही जैतापूरला आंदोलन केले, पण आंदोलकांना प्रकल्पस्थळी जाण्यापासून रोखले जात आहे.
या पाश्र्वभूमीवर आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी मुंबईत आंदोलन सुरू करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. यासंदर्भात ठाकरे यांच्याशी चर्चा करून मुंबईत आंदोलन करण्याबाबतची तारीख ठरविली जाईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले. ‘मेक इन इंडिया’ सप्ताह सुरू असताना विदेशी गुंतवणूक असलेल्या प्रकल्पाविरोधात आंदोलन झाल्यास त्यातून चुकीचा संदेशही जाईल. त्यामुळे हे आंदोलन सप्ताह झाल्यानंतर केले जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र शिवसेनेच्या विरोधाला भीक न घालता पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस हा प्रकल्प पुढे रेटत असल्याने शिवसेना नाराज आहे. सरकारमध्ये सामील असतानाही किंमत दिली जात नसल्याने शिवसेना आता आक्रमक भूमिका घेणार आहे. मात्र शिवसेनेने सप्ताहातील मुहूर्तावर आंदोलन सुरू केल्यास सरकारची पंचाईत होणार आहे.