शिवसेनेचा विरोध पाकिस्तानला असून अन्य राष्ट्रांना नाही. त्यामुळे शिवसेनेच्या कृतीमुळे परकीय गुंतवणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले. शिवसेनेमुळे महाराष्ट्राची बदनामी झाली असून परकीय गुंतवणुकीवर गंभीर परिणाम होईल, अशी भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली असून त्याची खिल्लीही या मंत्र्याने उडविली.

शिवसेनेच्या कृतीमुळे त्याची प्रतिक्रिया देशभरातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटली आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार महाराष्ट्रात येणार नाहीत, अशी शंका उपस्थित करण्यात आली आहे. त्याचा चांगलाच समाचार शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आहे.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रभक्तीतून सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई टाकली असून परदेशी व्यक्तीला कोणत्याही प्रकारे त्रास दिलेला नाही. त्यामुळे या घटनेचा कोणताही परिणाम गुंतवणुकीवर होणार नाही. अमेरिका किंवा आपल्या देशातही दहशतवादी हल्ले होऊनही त्याचा फारसा परिणाम आर्थिक गुंतवणुकीवर झाला नाही. पाकिस्तानची भारतात फारशी आर्थिक गुंतवणूक नसून त्यांनी आपल्याकडे ती केली नाही, तरी चालेल, असे या ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले.