भूमी अधिग्रहण विधेयकाच्या सध्याच्या मसुद्यास शिवसेनेचा विरोध कायम असून आम्ही सुचविलेल्या सुधारणा महाराष्ट्रात अमलात आल्या पाहिजेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, असे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. सध्याच्या मसुद्यामध्ये जे पाच अपवाद करण्यात आले आहेत, ते जसेच्या तसे अमलात आणले, तर ८० टक्क्य़ांहून अधिक प्रकल्पांसाठी भूमी अधिग्रहण करता येईल. विकासाला आमचा विरोध नसून शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने काढलेल्या पहिल्या अध्यादेशानुसार राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी अधिसूचना जारी करून तो जसाच्या तसा अमलात आणला होता. त्यास शिवसेनेचा विरोध असल्याने महसूल राज्यमंत्री राठोड यांनी स्वाक्षरी केली नव्हती.