उपमुख्यमंत्रीपदासह गृह, सार्वजनिक बांधकाम, उर्जा, जलसंपदा अशी १९९५ च्या सूत्रानुसार महत्वाची खाती आणि केंद्रात आणखी दोन मंत्रीपदेदेऊन शिवसेनेचा योग्य सन्मान राखला जाणार असेल, तरच शिवसेना सरकारमध्ये सामील होईल, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना स्पष्ट केले आहे. आधीची भूमिका तसूभरही न बदलता शिवसेनेने भाजपच्या कोर्टात चेंडू टाकला असून या मागण्या मान्य करण्याची भाजपची तयारी नाही. यावर अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढील बोलणी करण्याची भूमिका केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान यांनी ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेत घेतली. शहा यांची शनिवारची मुंबई भेट रद्द झाली असून या चर्चेत सहभागी होण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ही भेट टाळली असल्याची चर्चा सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा अप्रत्यक्ष पाठिंबा घेतल्याने जनमानसात नाराजी असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या काही नेत्यांनी शिवसेनेशी जुळवून घेवून सरकार चालवावे, अशी भूमिका घेतली आहे. गेली १५ वर्षे सत्तेबाहेर राहिल्याने आता संधी घालवू नये, असे शिवसेनेच्या काही नेत्यांनाही वाटत आहे. पण शिवसेना नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांवर केलेली टीका आणि त्यांचे वर्तन याचा राग अजूनही भाजप नेत्यांच्या मनात आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या अटींवर नाही, तर भाजपच्या इच्छेनुसार शिवसेनेने सत्तेतील सहभागाचे सूत्र मान्य केल्यासच त्यांना सरकारमध्ये सामील करुन घेण्याची भाजपची भूमिका आहे. शिवसेनेला मंत्रिमंडळातील सदस्य संख्येच्या एक तृतीयांश म्हणजे साधारणपणे उपमुख्यमंत्रीपदासह १० मंत्रीपदे अपेक्षित आहेत. ज्याप्रमाणे १९९५ मध्ये खात्यांच्या वाटपाचे सूत्र होते, तेच सूत्र महत्वाच्या खात्यांसाठी कायम रहावे, अशी सेनेची भूमिका आहे. केंद्र सरकारमध्ये आणखी एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद द्यावे, अशीही सेनेची मागणी आहे. भाजपला आता राष्ट्रवादीपेक्षा आपली साथ हवी आहे, हे लक्षात आल्याने शिवेसेनेने आधीच्या मागण्या कायम ठेवल्या आहेत.

चर्चेच्या फेऱ्यांवर फेऱ्या
भाजप नेते धमेंद्र प्रधान आणि चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन बोलणी केल्यावर आता उभयपक्षी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. प्रधान २ डिसेंबर-पर्यंत मुंबईतच मुक्कामाला असून शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेण्याची कामगिरी फत्ते करण्याच्या सूचना त्यांना पक्ष नेतृत्वाने दिल्या आहेत. ठाकरे यांनी भाजप नेत्यांशी बोलणी केल्यानंतर अनंत गीते यांच्याशीही चर्चा केली. नंतर काही मुद्दय़ांवर प्रधानांशी बोलणी करण्यासाठी  गीते व सुभाष देसाई हे  सह्य़ाद्री अतिथीगृहावर गेले.