मुंबईमधील नालेसफाईची कामे चोख व्हावीत आणि नाले तुंबून मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक नाल्यांच्या साफसफाईवर बारकाईने लक्ष ठेवण्याची जबाबदारी शिवसेनेच्या शाखाप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे सध्या शिवसेनेचे शाखाप्रमुख आपापल्या विभागांतील नाल्यांवर चकरा मारू लागले आहेत.
निविदा प्रक्रियेस विलंब झाल्याने यंदाही प्रशासनाकडून नालेसफाईचे प्रस्ताव विलंबाने स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात आले. या प्रस्तावांमध्ये नाल्यांतून उपसलेला गाळ कुठे टाकणार याची माहिती नसल्यामुळे शहरांतील मोठय़ा नाल्यांच्या सफाईचा प्रस्ताव रोखून इतर प्रस्ताव मंजूर करण्यात आले, असे स्पष्टीकरण स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिले.
गेल्या वर्षी नालेसफाईच्या कामांमध्ये घोटाळा झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे गाळ कुठे टाकला याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने गाळ कुठे टाकणार याची माहिती प्रस्तावांमध्ये करायला हवी होती. ही माहिती एकाही प्रस्तावात नव्हती. मात्र नालेसफाईची कामे सुरू व्हावीत म्हणून इतर प्रस्ताव मंजूर करण्यात आले. केवळ शहरामधील नाल्यांचा प्रस्ताव रोखून ठेवला होता. सोमवारच्या बैठकीत प्रशासनाने हा गाळ कुठे टाकणार याची माहिती दिल्यानंतर तो प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात आला, असे सांगून यशोधर फणसे म्हणाले की, नालेसफाईच्या प्रस्तावांबाबत केवळ शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. भाजप आणि इतर पक्षांकडूनही तशी मागणी करण्यात आली होती.
नालेसफाईच्या कामांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र गेल्या वर्षी या कामांमध्ये घोटाळा झाल्यामुळे आता ठिकठिकाणच्या शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना नालेसफाईच्या कामांवर बारीक लक्ष ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार शिवसेनेचे शाखाप्रमुख कामाची पाहणी करीत आहेत, असेही ते म्हणाले. वाहून नेण्यात येणाऱ्या गाळाची मुंबईमधील वजनकाटय़ांवर मोजणी करण्यात येत आहे. नालेसफाईच्या कामांप्रमाणेच या वजनकाटय़ांचीही पाहणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

ब्रिटानिया उदंचन केंद्र सुरू होणार
ब्रिटानिया उदंचन केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या जून महिन्यात हे उदंचन केंद्र कार्यान्वित होईल. पालिकेने १०६ कोटी रुपये खर्च करुन उभारलेल्या या उदंचन केंद्रामुळे हिंदमातापासून थेट शिवडीपर्यंतच्या तब्बल १३ सखलभागांमध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा झटपट निचरा करणे पालिकेला शक्य होणार आहे. या उदंचन केंद्रामध्ये सहा पंप बसविण्यात आले आहे. त्यापैकी दोन पंप राखीव असून ते आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. एका मिनिटामध्ये सहा हजार लिटर पाण्याचा निचरा करण्याची क्षमता या पंपाची आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात हिंदमाता ते शिवडी दरम्यानच्या परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळेल, असा आशावाद यशोधर फणसे आणि सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी व्यक्त केला.