सुधार समितीमध्ये भाजप आणि विरोधी पक्षांनी एकमताने फेटाळलेला गच्चीवरील हॉटेलचा प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्याचा घाट शिवसेनेने घातला असून त्यासाठी शिवसेनेकडून भाजप नेत्यांची मनधरणी करण्यात येत आहे. मात्र गच्चीवरील हॉटेलविरोधात घेतलेल्या भूमिकेवर भाजप अद्याप ठाम आहे. त्यामुळे शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांचे गच्चीवरील हॉटेलचे स्वप्न साकारण्यासाठी पालिकेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.
मुंबईमधील इमारतींच्या गच्चीवर हॉटेलला परवानगी देण्यात यावी, अशी संकल्पना शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीपुढे सादर करण्यात आला होता. समाजवादी पार्टीने या प्रस्तावाचे समर्थन केले होते. मात्र सत्ताधारी भाजपने शिवसेनेची साथ सोडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसोबत या प्रस्तावाला कडाडून विरोध केला होता. भाजप आणि विरोधकांनी हा प्रस्ताव फेटाळून लावल्याने आदित्य ठाकरे यांचे स्वप्न भंगण्याचे चिन्ह निर्माण झाले. मात्र कोणत्याही परिस्थितीत या प्रस्तावाला मंजुरी द्यायचीच असा ठाम निर्धार आता सत्ताधारी शिवसेनेने केला आहे.आदित्य ठाकरे यांचा रोष ओढवू नये म्हणून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आता हा प्रस्ताव सभागृहाच्या बैठकीसमोर मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सभागृहाच्या पुढील आठवडय़ातील बैठकीत हा प्रस्ताव सादर होणार आहे. परंतु गच्चीवरील हॉटेलबाबत घेतलेल्या भूमिकेवर भाजप अद्यापही ठाम आहे. त्यामुळे भाजप नेत्यांची मनधरणी करण्यास शिवसेना नेत्यांनी सुरुवात केली आहे.
शिवसेना आणि समाजवादी पार्टीमध्ये विस्तव जात नव्हता. मात्र या प्रस्तावावर दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. मात्र समाजवादी पार्टीच्या ११ सदस्यांच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करणे शिवसेनेला अवघड आहे. त्यामुळे भाजपची साथ मिळाली तरच आदित्य ठाकरे यांचे स्वप्न साकार होणार आहे. पण भाजप मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे सभागृहात विरोधकांची कमी संख्या असताना हा प्रस्ताव मंजूर करून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. भाजप आणि विरोधकांनी शिवसेनेचा हा प्रयत्न हाणून पाडल्यास महापौर स्नेहल आंबेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे आणि सभागृह नेता तृष्णा विश्वासराव यांची धडगत नाही.