मित्रपक्ष असलेल्या भाजपवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेने शुक्रवारी पुन्हा एकदा महागलेल्या तूरडाळीच्या मुद्द्यावरून फडणवीस सरकारला टोला लगावला. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या विधानाचा आधार घेत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून तूरडाळीच्या दरांवरून सरकारला लक्ष्य करण्यात आले . एकेकाळी गाजलेल्या ‘सामना’ चित्रपटातील ‘मारुती कांबळेचे काय झाले?’ या ‘डायलॉग’प्रमाणेच ‘तूरडाळीच्या भावाचे काय झाले?’ असा सामान्य प्रश्‍न सामान्य जनता विचारीत आहे. त्यात आता मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अमृता वहिनींची भर पडली आहे व सामान्य गृहिणींच्या भावनांचा स्फोट केल्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम महिलावर्गातर्फे आम्ही त्यांना लाख लाख धन्यवाद देत असल्याचे ‘सामना’तील या लेखात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरातूनचं या प्रश्नाला वाचा फुटली हे चांगलं झालं. डाळीच्या कमी भावाचं श्रेय घेण्यात आम्हाला रस नाही, पण सामान्यांच्या ताटात डाळ पडू दे, असे सांगत सेनेने मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
अन्नपुरवठा खात्याचे मंत्री गिरीश बापट गोदामांवर धाडी घालून सरकारच्या कार्यक्षमतेची तुतारी वाजवीत होते, पण आजही तूरडाळीचे भाव खाली उतरले नाहीत. आमच्या दृष्टीने हा विषय स्पर्धेचा किंवा चढाओढीचा नसून सरकारने तूरडाळीचे दर खाली आणल्यास स्वस्त तूरडाळीचे १०० काय, १००० टक्के श्रेय आम्ही मुख्यमंत्री व त्यांच्या भाजप मंत्र्यांना द्यायला तयार असल्याची भूमिका शिवसेनेने या लेखातून मांडली आहे.