पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या श्रीपाल सबनीस यांना भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात येणाऱ्या विरोधाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री कसुरी यांच्या मुंबई भेटीस शिवसेनेने केलेला विरोध भाजपला झुंडशाही वाटली, मग सबनीस यांच्या निमित्ताने जे सुरू आहे ते झुंडशाहीचे ‘श्रीखंडी’ स्वरूप आहे काय, असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामाना’तून विचारण्यात आला आहे.
नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी काही मुक्ताफळे उधळली आहेत व त्या विरोधात भारतीय जनता पक्षाने संमेलनाचे मैदान उखडण्याची धमकी दिली आहे. संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या तंगड्या वगैरे मोडून हातात देण्याची भाषा पुणे व परिसरातील भाजप खासदारांनी केली आहे. गुलाम अलीसारख्यांना संरक्षण देण्यासाठी आकाशपाताळ एक करू, असे महाराष्ट्राचे सरकार सांगत होते. शिवसैनिकांनी काही कुणाच्या तंगड्या वगैरे तोडून हातात देण्याची भाषा केली नव्हती. देशाच्या दुश्मनांना येथे पायघड्या घातल्याचा तो संताप होता. आता सबनीस यांच्याबाबतीत भाजप तेच करीत होते. फरक इतका की, आम्ही देशप्रेमासाठी केले व भाजप मोदीप्रेमासाठी करीत आहे. तरीही गुलाम अली व कसुरीप्रमाणे मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांच्या तंगड्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर आहे, असा खोचक टोला ‘सामना’तील अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांना लगावण्यात आला आहे.