शिवसेनेने आता भाजपचे वर्चस्व असलेल्या विदर्भावर लक्ष केंद्रित केले असून तेथे पक्षाची ताकद वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनाही उद्दिष्ट ठरवून देण्यात आले असून शिवसेनेला विदर्भात मुसंडी मारण्यासाठी वेगवेगळे उपक्रम व कार्यक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत भाजपने विदर्भात ४४  जागा मिळवीत चांगले यश संपादन केले आणि शिवसेनेला केवळ ४ जागा मिळाल्या. शिवसेना संघटना पातळीवर फारशी मजबूत नसल्याने तेथे फारसे यश मिळू शकले नाही. त्यामुळे आता शिवसेनेची ताकद विदर्भात वाढविण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शिवसेना कार्यकर्ते, शाखाप्रमुख व अन्य मंडळी जनतेची कामे घेऊन येतील, ती तातडीने मार्गी लावावीत. पक्षवाढीला उपयुक्त ठरतील, असे उपक्रम राबवावेत, अशा सूचना शिवसेनेच्या मंत्र्यांना देण्यात आल्या आहेत. दुर्गम भागातील रुग्णांचे रोगनिदान अचूक व लवकर व्हावे आणि त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ‘टेलिमेडिसिन’ संकल्पना मांडली आहे. मेळघाट व गडचिरोलीत प्रत्येकी दोन आरोग्य केंद्रांवर ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरु केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादरीकरण केल्यावर ती व्यापक स्वरुपात सुरु करण्याचाही शिवसेनेचा प्रयत्न आहे.
शिवसेनेला पक्ष पातळीवर श्रेय मिळेल, असे कार्यक्रम व योजना मार्गी लावून जनतेपर्यंत पोचण्याचे पक्षाचे प्रयत्न आहेत, असे सूत्रांनी सांगितले.