महालक्ष्मी येथील रेसकोर्सच्या भूखंडामध्ये पालिकेची जागा तुलनेत कमी असल्याने तेथे थीम पार्क उभारण्याबाबत एकत्रित निर्णय घेण्याची विनंती प्रशासनाने राज्य सरकारला पत्र पाठवून केली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे रेसकोर्सवर थीम पार्क उभारण्याचे महत्त्वाकांक्षी स्वप्न साकारणे भाजपच्या हाती असल्याची चर्चा सुधार समितीच्या बैठकीत रंगली होती. पालिका निवडणुकीपूर्वी हा मुद्दा उपस्थित करून जनतेच्या भावनांचा खेळ करण्यात येत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली.

महालक्ष्मी येथील रेसकोर्सच्या भूखंडाचा भाडेकरार २०१३ मध्ये संपुष्टात आला आहे. रेसकोर्सवरील सुमारे ८.५५ लाख चौरस मीटर भूखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क उभारावे अशा ठरावाची सूचना शिवसेनेने पालिका सभागृहात २०१३ मध्ये मंडली होती. सभागृहाच्या मंजुरीनंतर ही ठरावाची सूचना राज्य सरकारकडे पाठविण्यात आली होती. मात्र या ठरावाच्या सूचनेवर कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती देणारा अहवाल पालिका प्रशासनाने मंगळवारी सुधार समितीच्या बैठकीत सादर केला होता. रेसकोर्सवरील २.५८ लाख चौरस मीटर इतका भूखंड पालिकेचा आहे. भाडेकरार २०१३ मध्ये संपुष्टात आला आहे. मग  हा भूखंड पालिकेने ताब्यात का घेतला नाही, असा सवाल शिवसेनेचे नगरसेवक राजू पेडणेकर यांनी यावेळी उपस्थित केला. भूखंड ताब्यात घेतल्यानंतर त्यावर थीम पार्क कसे उभारायचे याचा विचार करता आला असता, असेही ते म्हणाले. निवडणुका जवळ आल्यामुळे शिवसेना आणि भाजपकडून थीम पार्कचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. निवडणुकांनंतर या दोन्ही पक्षांना थीम पार्कचे विस्मरण होईल, असा टोला नगरसेवक नोशीर मेहता यांनी हाणला.