मनसेचे वर्चस्व कमी करण्यासाठी पुनर्विकास रखडलेल्या इमारतींसाठी आंदोलन

एके काळी शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा दादर परिसर मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत मनसेच्या ताब्यातून पुन्हा खेचून घेण्यासाठी शिवसेनेने व्यूहरचना आखली आहे. आगामी काळात दादर-माहीम मतदारसंघात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्याबरोबरच येथील पुनर्विकास रखडलेल्या इमारतींमधील रहिवाशांसाठी जनआंदोलन हाती घेतले आहे. एकीकडे मनसेचे नगरसेवक आणि पदाधिकारी आपल्या पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करतानाच सेनेने आता मतदारांनाही आकर्षित करण्याची तयारी चालवल्याने मनसेत अस्वस्थता आहे. मात्र, ‘राज्यात आणि पालिकेत सत्तेवर असताना पुनर्विकासाचा निर्णय घेऊ न शकणाऱ्या शिवसेनेचा मतदरांना भुलविण्यासाठीचा उद्योग आहे,’ अशी टीका मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

शिवसेनेने दादर-प्रभादेवीमधील पुनर्विकास रखडलेल्या काही इमारतींमधील रहिवाशांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री रवींद्र वायकर तसेच सेनेचे आमदार सदा सरवणकर आदी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीच्या तोंडवार दादरचा गड मनसेकडून पुन्हा मिळविण्यासाठी सेनेने ही मोर्चेबांधणी सुरू केली असून यापूर्वी विधानसभा निवडणुकीतील जागा मनसेकडून खेचून घेतल्यानंतर येथील सहाही नगरसेवकांच्या जागा पुन्हाजिंकण्यासाठी सेनेने वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यास सुरुवात केली आहे.

या पाश्र्वभूमीवर मनसेने प्रत्युत्तर देण्याची तयारी केली असून नगरविकास विभागाची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांना जाब विचारण्याची हिम्मत शिवसेना का दाखवत नाही, असा सवाल बाळा नांदगावकर यांनी केला आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सत्तेत असलेल्या शिवसेनेला आत्ताच कशी जाग आली असा सवाल मनसेने केला आहे. मुंबईकरांना गृहीत धरून सेना-भाजपचे बोके आता सत्तेच्या लोण्यावर डोळा ठेवून दादर-प्रभादेवी व माहीममधील पुनर्विकास रखडलेल्या इमारतींमधील रहिवाशांची फसवणूक करत असल्याची टीका नांदगावकर यांनी केली.