९५ जागांसाठी २० ऑगस्टला मतदान; सत्ता परिवर्तन होण्याचा काँग्रेसला विश्वास

जैन आणि उत्तर भारतीय समाजाचे प्राबल्य असलेल्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या २० ऑगस्टला होणाऱ्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि काँग्रेस अशी लढत असली तरी बिगर मराठी समाजाच्या मतदारांचे प्रमाण लक्षात घेता सत्ताधारी भाजप सत्ता कायम राखेल अशीच एकूण चिन्हे आहेत.

मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी जाहीर केला. ९५ जागांसाठी २० ऑगस्टला मतदान होणार आहे. २६ जुलै ते २ ऑगस्ट या काळात उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. ५ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. २१ ऑगस्टला मतमोजणी होईल. एकूण ९५ जागांपैकी ४८ जागा महिलांसाठी राखीव आहेत. मतदारांची संख्या सुमारे सहा लाख आहे. ६४ प्रभाग हे सर्वसाधारण गटात असून, इतर मागास प्रवर्ग (२६), अनुसूचित जाती (४) तर अनुसूचित जमातीसाठी एक जागा राखीव आहे. संगणकीय प्रणालीच्या माध्यमातूनच उमेदवारी अर्ज दाखल करावे लागतील.

भाजपला पुन्हा संधी?

भाईंदर शहरात जैन समाजाचे प्राबल्य आहे. याशिवाय गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीयांची मतेही मोठय़ा प्रमाणावर आहेत. जैन, गुजरात, मारवाडी तसेच उत्तर भारतीय हे भाजपला पाठिंबा देतात, असे विधानसभा तसेच महानगरपालिका निवडणुकीत मुंबईत अनुभवास आले. मीरा-भाईंदरमध्ये हा कल गेल्या महानगरपालिका तसेच विधानसभा निवडणुकीत बघायला मिळाला होता. यापूर्वी भाजप आणि राष्ट्रवादीत चुरस असायची. पण राष्ट्रवादीचे बडे नेते आणि माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोंसा यांच्यासह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था कमकुवत झाली आहे. राष्ट्रवादी कमकुवत झाल्याचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो. आगरी, कोळी व अन्य मराठी मतदारांवर शिवसेनेची मदार आहे. काँग्रेसचे स्थानिक नेते आणि माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला मीरा रोड परिसरात चांगले यश मिळते. अल्पसंख्याक समाज काँग्रेसच्या मागे उभा राहतो, असा आतापर्यंतचा इतिहास आहे.

दोन वर्षांपूर्वी जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वात मांसविक्री चार दिवस बंद ठेवण्याच्या मुद्दय़ावरून मीरा-भाईंदरमध्ये मोठा वाद झाला होता. तेव्हा मराठी विरुद्ध जैन अशी वादाची किनार होती. महापालिका निवडणुकीत मराठी विरुद्ध बिगर मराठी हा प्रचाराचा मुद्दा होण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीची घोषणा होताच भाजपचे निरीक्षक खासदार कपिल पाटील आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सायंकाळी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळाली पाहिजे, असे दोन्ही नेत्यांनी बजावले. प्रचार कशा पद्धतीने करायचा याची चर्चा करण्यात आली.

जैन, उत्तर भारतीय, गुजरात आणि मारवाडी समाजाचे मीरा-भाईंदरमध्ये प्राबल्य आहे. हे सारे समाज भाजपच्या पाठीशी उभे राहतात. याशिवाय मराठी मतदारांमध्येही भाजपबद्दल चांगले मत आहे. या सर्वाचा तसेच सत्ता असताना केलेल्या विकासकामांचा भाजपला फायदा होईल. लढत शिवसेनेशी असली तरी भाजपला पूर्ण बहुमत मिळेल.   – खासदार कपिल पाटील, भाजप ठाणे विभागीय अध्यक्ष

शिवसेनेची मीरा-भाईंदरमध्ये चांगली ताकद आहे. तसेच मतदारांचा पाठिंबा आहे. आमदार या नात्याने केलेली कामे तसेच भाजपबद्दल असलेल्या नाराजीचा शिवसेनेला फायदा होईल.  –प्रताप सरनाईक, शिवसेना आमदार

महानगरपालिकेतील भाजपची सत्ता असताना शहराची झालेली दैन्यवस्था, महानगरपालिकेतील भ्रष्टाचार यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. भाजपकडून कायमच जातीयवादाला खतपाणी घालण्यात आले. निवडणुकीत सत्ताबदल होईल आणि काँग्रेसचा महापौर निवडून येईल. – मुझफ्फर हुसेन,काँग्रेसचे माजी आमदार