भाजपने ‘अरे’ केल्यावर शिवसेना ‘कारे’ करणार हे ठरलेले. पण युतीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दोन्ही वक्तव्यांवरून शिवसेनेने कोणतीही तिखट प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे टाळले, पण मुंबई महापालिका निवडणुकीत युती करण्याच्या वक्तव्याचे स्वागतच केले. 

शिवसेनेशी युती तुटल्याने आमच्या ताकदीचा अंदाज आला, असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी कोल्हापूरमध्ये केले होते. यावरून भविष्यात शिवसेनेशी युती करण्याचे भाजप टाळणार, असा अर्थ काढला जाऊ लागला. तथापि, दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी भूमिका काहीशी मवाळ केली आणि मुंबई महापालिका निवडणुकीत युती कायम राहील, असे जाहीर केले. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेण्याचे टाळले.
पक्षाच्या कार्यकर्त्यांचे नैतिक बळ उंचाविण्याकरिता अशी वक्तव्ये केली जातात. त्यात काही चुकीचे नाही. परंतु, मुंबई महापालिका निवडणुकीत युती कायम राहील हे दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे आहे याकडे शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांनी लक्ष वेधले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या देसाई यांनी भाजपला लक्ष्य न करता काहीशी मवाळ भूमिका घेतल्याने शिवसेना या मुद्दय़ावर टोकाची भूमिका घेणार नाही हे स्पष्ट झाले. जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचा पुनरुच्चार खासदार देसाई यांनी केला. या मुद्दय़ावर शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे लवकरच आपली भूमिका स्पष्ट करतील, असेही देसाई यांनी सांगितले.