शिवसेनेने ऐन उमेदीची पंचवीस वर्षे युतीमध्ये राहून वाया घालवली, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातील मुलाखतीत त्यांनी याबद्दल भाष्य केले आहे. कालच शिवसेना आमदारांबरोबर झालेल्या बैठकीनंतर उद्धव यांनी भाजपला सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीमध्येही उद्धव यांनी भाजपसोबतच्या दीर्घकालीन युतीमुळे सेनेला नुकसान सोसावे लागल्याचे म्हटले.  तेव्हाची हिंदुत्त्वाची  गरज म्हणून बाळासाहेबांनी भाजपसोबत युती केली. शिवसेनाप्रमुखांबरोबर तेव्हा सगळे टोलेजंग नेते होते. महाराष्ट्र ठामपणे शिवसेनाप्रमुखांच्या पाठीशी उभा राहिला तो हा काळ. पण युती न करता शिवसेना लढत राहिली असती तर आजचे चित्र वेगळे असते.  सेनेची ही चांगली पंचवीस वर्षे दुर्दैवाने युतीमध्ये सडली, अशी खंत यावेळी उद्धव यांनी बोलवून दाखविली. तसेच सरकारच शिवसेनेची कोंडी करतंय , असे वाटेल त्या क्षणी मी सरकारमध्ये राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. भाजप स्वबळाची भाषा करत असेल तर शिवसेनेलासुद्धा कोणी अडवलेलं नाही. पंचवीस वर्षांपूर्वीची  युती ही एका विचाराने झालेली. ध्येयधोरणाची ती युती होती. म्हणून ती पंचवीस वर्षे टिकली होती. मात्र, आताची युती ही राजकीय स्वरूपाची असल्याचे सांगत उद्धव यांनी आगामी काळात सेनेची स्वतंत्र चूल मांडण्याचे संकेत दिले. याशिवाय, बिहार आणि तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकांचा दाखला देत भाजपला प्रादेशिक पक्ष म्हणून असलेल्या सेनेच्या ताकदीची जाणीव करून देण्याचा प्रयत्नही उद्धव यांनी केला.
शिवसेनाप्रमुखांनी केलेली युती भाजपने विधानसभा निवडणुकीच्यावेळी तोडली. प्रथमच शिवसेना एकट्याने एकहाती विधानसभा लढली, पण हे झालं शेवटच्या पंधरा दिवसांत. त्यामुळे कित्येक ठिकाणी तर शिवसेनेची तयारीसुद्धा नव्हती. तरीसुद्धा शिवसैनिकांनी मोठ्या वादळाला टक्कर दिली, असे उद्धव यांनी सांगितले.